बागलाणमध्ये ६०० हेक्टरवरील बागांचे नुकसान
बागलाणमध्ये ६०० हेक्टरवरील बागांचे नुकसान
नाशिक : ढगाळ हवामान, अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी आणि वातावरणात पसरलेला गारठा याचा फटका कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) तालुक्यातील हंगामपूर्व द्राक्षांना बसला आहे. द्राक्ष घडात पाणी साचून तडे जाण्याचे प्रकार घडले. बागलाण तालुक्यात सुमारे ६०० हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. शेवग्यालाही फटका बसला. हंगामपूर्व द्राक्ष वगळता अन्य बागांचे नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सकाळी दाट धुके, दिवसभर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारही त्याला अपवाद ठरला नाही. भल्या सकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी नऊ मिलीमीटर पाऊस झाल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. मागील तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने गारठा वाढलेला आहे. दिवसाही उबदार कपडे परिधान करावे लागतात. करोनाकाळात हे विचित्र हवामान अन्य आजारांना निमंत्रण देणारे ठरण्याची धास्ती
आहे. अवकाळी पावसाने सटाणा, देवळा परिसरातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले.
या भागात द्राक्ष काढणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. काढणीवर आलेली द्राक्षे अवकाळीच्या कचाटय़ात सापडली. द्राक्षांवर पाणी साचून घडांना तडे गेले. काही ठिकाणी कूज होण्याची धास्ती आहे. बागलाणच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार अवकाळी पावसामुळे ५३ गावांतील ६९३ शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.
या एकाच तालुक्यात अंदाजे ६०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अर्थात यामध्ये द्राक्ष बागांचे क्षेत्र ५९८.१७ हेक्टर आहे. पाच हेक्टरवरील शेवगा पिकाचे नुकसान झाले. निफाड, दिंडोरीसह अन्य भागातील द्राक्ष बागा फुलोरा प्रक्रियेतून पुढे गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पावसाची अद्याप झळ बसली नसल्याचे शेतकरी सांगतात.
बागलाण तालुक्यात पाऊस, थंड वातावरणामुळे काही बागांमध्ये द्राक्ष मण्यांना तडे गेले. उर्वरित भागातील द्राक्ष बागांचे अवकाळी पावसाने नुकसान झालेले नाही. जिल्ह्यत अन्य पिकांची उशिराने लागवड झाली होती. पावसाचे प्रमाणही फारसे नाही. त्यामुळे अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाही.
– संजीव पडवळ, (जिल्हा कृषी अधिकारी)