एकाच राज्यात येणार भाजपाची सत्ता; पवारांचा दावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधान परिषदेतील १२ रिक्त जागांसाठी नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मात्र, यावर राज्यपालांकडून अद्यापही कार्यवाही झालेली नाही. विधान परिषदेतील आमदार नियुक्तीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी बारामती येथे आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त केली. “राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्य सरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेनं दिलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हे जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशाप्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते, हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं, हे त्यांच्या राज्यातसुध्दा. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल करतायेत आणि असे असताना केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक आहे,” असं शरद पवार म्हणाले.
पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकीसंदर्भातही पवार यांनी राजकीय अंदाज व्यक्त केला.”पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल. केवळ आसाममध्ये भाजपाची सत्ता राहिल, असे भाकीत शरद पवार यांनी यावेळी केलं.
“आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल. हा ट्रेंड असून, हा पाच राज्यांचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल. पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल,” असा दावा पवार यांनी व्यक्त केला आहे.