हिंडेनबर्गच्या धक्क्यानंतर अदाणी समुहाचा आणखी एक मोठा करार रद्द; नुकसान मात्र महाराष्ट्राचे झाले
भारतीय अब्जाधीश गौतम अदाणी यांच्यासमोरच्या अडचणी संपत नाहीत. २४ जानेवारी रोजी अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेने दिलेल्या अहवालानंतर अदाणी समूहाचे शेअर्स गडगडले. त्यामुळे अब्जावधीचं नुकसान अदाणी समूहाला सहन करावं लागलं. त्यानंतर आता त्यांच्या हातातून एक मोठी डीलही निघून गेली आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रांसच्या एका कंपनीने देखील अदाणी समूहासोबतचा करार रद्द केला होता. त्यानंतर आता भारतातीलच एका मोठ्या कंपनीने अदाणी समूहासोबतच करार रद्द केला आहे. मात्र हा करार रद्द झाल्यामुळे एकप्रकारे महाराष्ट्राचेच नुकसान झाले आहे.
कोणता करार रद्द झाला?
सी.के. बिर्ला समूहाचा भाग असलेल्या ओरिएंट सिमेंट या कंपनीने अदाणी समूहाच्या अदाणी पॉवर महाराष्ट्र लि. (APML) सोबत सिमेंट ग्रीडींग युनिट (CGU) स्थापन करण्यासाठी झालेला करार रद्द केला आहे. याबाबतचे कारण देत असताना ओरिएंट सिमेंटने सांगितले की, एपीएमएलला आम्ही या कराराचा पाठपुरावा करु नका, असा निराप दिला आहे. सिमेंट युनिट बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीची परवानगी मिळू शकलेली नाही. त्यामध्ये काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच आमच्यातील सामंजस्य करारानुसार प्रकल्पासाठी जी विहित वेळ ठरविण्यात आली होती, ती ओलांडून गेली आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करत आहोत.
महाराष्ट्राचे नुकसान कसे?
सप्टेंबर २०२१ रोजी दोन्ही कंपन्यांनी मिळून महाराष्ट्रातील तिरोडा येथे सिमेंट ग्रीडिंग युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे या प्रकल्पासाठी ३५ एकर जमीन निश्चित करण्यात आली होती. या जमिनीच्या वापरासंबंधी एपीएमएलसोबत करार करण्यात आला होता. हा करार रद्द झाल्यामुळे आता महाराष्ट्रात आणखी एक प्रकल्प होऊ शकलेला नाही. यामुळे विदर्भात निर्माण होणारे रोजगार, राज्याचा महसूल बुडाला आहे.
अदाणींची श्रीमंताच्या यादीतून घसरण
फ्रान्सच्या टोटल एनर्जीज या ऊर्जा क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने अदाणी समूहाबरोबर केलेली भागीदारी स्थगित केली होती. अदाणींच्या तब्बल ५० अब्ज डॉलर्सच्या हायड्रोजन प्रकल्पात ही कंपनी सर्वांत मोठी परदेश गुंतवणूक करणार होती. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांबाबत स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय प्रकल्प पुढे जाणार नसल्याचे टोटल एनर्जीजने जाहीर केले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर महिन्याभरातच अदाणी हे अब्जाधीशांच्या यादीतून खाली सरकले असून आता ते दुसऱ्या क्रमाकांहून थेट खाली २९ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.