गोरक्षक अॅड. कपिल राठोड यांचाही होणार सन्मान
प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने शिवप्रताप दिनानिमित्त देण्यात येणारा वीर जीवा महाले पुरस्कार प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांना तर अभिवक्ता पंताजीकाका बोकील पुरस्कार गोरक्षक अॅड. कपिल राठोड यांना जाहीर करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण कार्यक्रम अक्षय तृतीय्येच्या मुहूर्तावर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध केला. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून तसेच वाईनगरीचा अफजलखानाच्या विळख्यातून मुक्त केल्याबद्दल समितीच्या वतीने मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार शिवप्रताप दिनी पुरस्कार वितरण न करता १५ मे २०२१ रोजी अक्षय तृतीय्येच्या मुहूर्तावर होईल. यावेळी शिवव्याख्याते ह.भ.प. राकेश पिंजण (उरळी देवाची) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी शाहीर शरद यादव (दरेवाडी- बावधन) यांचा अफजलखान वधाचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार असल्याचे समितीने दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.