“१२ ते १७ वयोगटातील मुलांवर लस चाचणीची परवानगी द्या”; जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा अर्ज

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं भारतात १२ ते १७ वयोगटातील मुलांवर करोना लसीची चाचणी करण्यासाठी केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सिंगल डोस करोना व्हॅक्सिनला दोन आठवड्यापूर्वी भारतात मंजुरी देण्यात आली आहे. आता जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं भारतात १२ ते १७ वयोगटातील मुलांवर करोना लसीची चाचणी करण्यासाठी केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली आहे.

“आम्ही लहान मुलांवर करोना लसीची चाचणी करण्यासाठी मंगळवारी अर्ज केला आहे. लहान मुलांचं लसीकरण लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”, असं कंपनीने आपल्या  अर्जात म्हटलं आहे. “करोनाची साथ रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे.”, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हे वाचले का?  ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

लसीची परिणामकारकता किती?

  • वैद्यकीय चाचण्यांत ही लस ८५ टक्के परिणामकारक ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे.
  • डेल्टा विषाणूपासूनही संरक्षण मिळते, असेही कंपनीचे म्हणणे आहे.
  • संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूपासून संरक्षण देते, असाही कंपनीचा दावा आहे.
  • ‘बायॉलॉजिकल ई’ ही कंपनी या लशीचे भारतात उत्पादन करणार आहे.
  • या लशीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.

भारत सरकारने ७ ऑगस्ट २०२१ रोजी आमच्या एक मात्रेच्या लसीस आपत्कालीन वापराचा परवाना दिला आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाऊ शकते. ही लस डेल्टासह, करोनाच्या सर्व उत्परिवर्तित प्रकारांपासून संरक्षण देते. तिची परिणामकारकता ८५ टक्के आहे. सर्व भागांमध्ये तिच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोना संसर्गानंतर रुग्णालयात दाखल होण्यापासून तसेच मृत्यूपासूनही ती संरक्षण करते, असा दावा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रवक्त्याने केला. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने ५ ऑगस्टला एक मात्रा लसीला आपत्कालीन वापराच्या परवान्यासाठी अर्ज केला होता.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ५७१ करोनाबाधित आढळले असून ५४० जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ६३ हजार ६०५ वर पोहोचली आहे. ही रुग्णसंख्या गेल्या १५० दिवसांतील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत ३६ हजार ५५५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख ६१ हजार ६३५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.५४ टक्क्यांवर आहे.

हे वाचले का?  Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत