१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक

भूलथापा देत एकाने तामिळनाडूस्थित व्यक्तीकडे सेवा शुल्कापोटी १५ कोटींची मागणी करुन सुमारे पाच कोटी नऊ लाख रुपये घेत फसवणूक केली.
नाशिक : राजकीय नेतेमंडळींशी आपली ओळख असून कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देऊ शकतो, अशा भूलथापा देत एकाने तामिळनाडूस्थित व्यक्तीकडे सेवा शुल्कापोटी १५ कोटींची मागणी करुन सुमारे पाच कोटी नऊ लाख रुपये घेत फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली.

यासंदर्भात नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी (५६, कोट्टीवक्कम, चेन्नई, तामिळनाडू) यांनी तक्रार दिली. संशयित निरंजन कुलकर्णी (४०, सेवन श्री अपार्टमेंट, मोटवानी रोड, नाशिकरोड) याला अटक करण्यात आली आहे. संशयिताने रेड्डी यांना जानेवारीत शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलावून घेतले होते. अनेक राजकीय मंडळींशी आपला परिचय असल्याचा दावा करुन कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या कामासाठी १५ कोटी रुपये सेवा शुल्क द्यावे लागेल, असे सांगितले. पुढील भेटीत संशयित कुलकर्णीने विश्वास संपादन करण्यासाठी हे काम करता न आल्यास आपल्या नावावरील जमिनीचे खरेदीखत रेड्डी यांच्या नावे करून देण्याची तयारी दर्शविली. यावेळी संशयिताने पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्पालगतची १०० एकर जमीन शासनाकडून करारावर घेतल्याचे बनावट दस्तावेज. नाशिकजवळील चांदशी येथील जागेचे बनावट दस्तावेज दाखवून विश्वास संपादित केला. रेड्डी या भूलथापांना बळी पडले. त्यांच्याकडून रोख स्वरुपात आणि त्यांचे नातेवाईक व संस्थेच्या खात्यावरून फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत पाच कोटी आठ लाख ९९ हजार ८७८ रुपये संशयिताने घेतले. नंतर संशयिताच्या कागदपत्रांची छाननी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

हे वाचले का?  ISRO ची कमाल! थेट अवकाशातून टिपली महाकुंभची छायाचित्रे, पाहा झलक

तक्रारदाराने आपल्या पैश्यांची मागणी केल्यावर संशयित कुलकर्णीने त्यास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित निरंजन कुलकर्णीला अटक करुन रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयितास १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात, १५०० की २१०० आले? महिलांनो ‘असा’ चेक करा बँक बॅलन्स!