३७९० कोटींची बेकायदेशीर संपत्ती सापडली, माजी मंत्र्याविरोधात ED ची कारवाई; ड्रायव्हरच्या नावे २०० कोटी तर मुंबई-पुण्यातही प्रॉपर्टी

बुधवारपासून ईडीची ही छापेमारी सुरु आहे

आर्थिक घोटाळ्यांप्रकरणात आरोपी असणारे समाजवादी पक्षाच्या सरकारमधील माजी मंत्री राहिलेल्या गायत्री प्रसाद प्रजापती यांच्या घरासोबतच कार्यालयामध्येही सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे मारण्यात आले. या कारवाईमध्ये अनेक कागदपत्र, हवाला माध्यमातून फिरवण्यात आलेल्या पैशांसदर्भातील माहिती ईडीच्या हाती लागली आहे. बुधवारी आणि शुक्रवारी ईडीने केलेल्या या कारवाईमध्ये गायत्री प्रजापतींबरोबरच त्यांची मुलं आणि जवळच्या नातेवाईकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापे मारले. या छाप्यांमध्ये बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामधील काही धक्कादायक कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहे.

माजी खाण मंत्री असणाऱ्या प्रजापती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असणाऱ्या ४४ हून अधिक ठिकाणच्या संपत्ती आणि जमिनींसंदर्भातील माहिती समोर आली आहे. या सर्व संपत्तीची किंमत तीन हजार ७९० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपत्ती बेकायदेशीररित्या कमावली असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्तीचे कागदपत्र सापडल्याने या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवण्यात आला असून अनेक ठिकाणी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. सुत्रांच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार ११ लाख रुपयांच्या जुन्या चलनी नोटा, पाच लाख किंमतीचे स्टॅम्प पेपर आणि इतरही बरीच संपत्तीची माहिती ईडीला मिळाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रजापती यांनी आपल्या नोकऱ्यांच्या नावाने संपत्ती जमा केल्याचे उघड झालं आहे. प्रजापती यांच्या ड्रायव्हरच्या नावावर २०० कोटींची संपत्ती असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागण्याचे वृत्त आहे.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

३० डिसेंबर रोजी ईडीच्या काही तुकड्यांनी लखनऊमध्ये प्रजापती यांच्या मुलाच्या कार्यालयाबरोबरच, कानपूरमधील प्रजापती कुटुंबियांचे चार्टड अकाउटंट, अमेठीमध्ये राहणारा प्रजापती यांच्या चालकाच्या घरी एकाचवेळी छापा मारला. या छापेमारीमध्ये ईडीला खूप महत्वाचे कागदपत्र हाती लागले आहेत. या सर्व कागदपत्रांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने कमावलेल्या संपत्तीची माहिती आहे. लखनऊमध्ये ईडीच्या तुकडीला काही वर्षांपूर्वीच चलनामधून हद्दपार झालेल्या ११ लाख रुपये मुल्य असणाऱ्या जुन्या चलनी नोटा, पाच लाख रुपये किंमतीचे स्टॅम्प पेपर, पुण्यामध्ये कोट्यावधींची संपत्ती, चालकाच्या नावे २०० कोटींच्या संपत्तीचे पुरावे सापडले आहेत.

छापेमारी करणाऱ्या तुकड्यांना असे अनेक पुरावे सापडलेत ज्यामधून प्रजापती कुटुंबाने बेकायदेशीररित्या संपत्ती जमा केल्याचं सिद्ध होत आहे. प्रजापती कुटुंबाने काळा पैसा हा अधिकृत कमाई असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचेही या कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. लखनऊमध्ये प्रजापती कुटुंबाने ११० एकर जमीन खरेदी केल्याचेही या कागदपत्रांमधून उघड झालं आहे. आता ईडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पुण्यामधील नोंदणी विभागाकडून येथील संपत्तीसंदर्भातील माहिती मागवली आहे. २०१९ साली ऑगस्टमध्ये गायत्री यांच्याविरोधात हवाला कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या गायत्री प्रजापती हे सामुहिक बलात्कार प्रकरणासाठी तुरुंगात आहेत तर त्यांचा मुलगा आर्थिक घोटाळ्यांच्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

ईडीच्या तपासादरम्यान समोर आलेली माहिती खालीलप्रमाणे

> एमजी हॉस्पीटॅलिटी – ९ ठिकाणी संपत्तीचे पुरावे मिळाले. एकूण अंदाजित किंमत ५७८ लाख रुपये. ठिकाण – सीतापूर आणि फैजाबाद

> अनिल प्रजापतींच्या नावे ११ ठिकाणी संपत्ती असल्याचे पुरावे मिळाले. एकूण अंदाजित किंमत ७५४ लाख रुपये. ठिकाण – लखनऊ, कानपूर, अमेठी आणि मुंबई

> एमएजीएस इंटरप्रायझेसच्या नावाने पाच ठिकाणी संपत्ती असल्याचे पुरावे सापडले. एकूण अंदाजित किंमत ९५ लाख रुपये. ठिकाण – लखनऊ, कानपूर

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

> अनुराग प्रजापती यांच्या नावे आठ ठिकाणी संपत्ती असल्याचे पुरावे सापडले. एकूण अंदाजित किंमत ३६० लाख रुपये. ठिकाण – लखनऊ, अमेठी, मुंबई, रायबरेली, सुल्तानपुर

> एमजी कोलोनायझर कंपनीच्या नावे दोन संपत्ती असल्याचे पुरावे सापडले. अंदाजित किंमत ७९ लाख रुपये. ठिकाण – लखनऊ.

> बेकायदेशीर संपत्तीचे एकूण ४४ पुरावे सापडले एकूण अंदाजित किंमत एक हजार ७१५ लाख रुपये. ठिकाण – लखनऊ

> शिल्पा प्रजापति यांच्या नावे एका ठिकाणी संपत्तीचे पुरावे सापडले. अंदाजित किंमत २१० लाख रुपये