५०० हून अधिक परीक्षा केंद्रे सज्ज

दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत.

जिल्ह्यात बारावीसाठी ७० हजारांहून अधिक  परीक्षार्थी

नाशिक : दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. शुक्रवारपासून इयत्ता १२ वीच्या परीक्षेला सुरुवात होत असून जिल्ह्यातून ७० हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. यासाठी ५०० हून अधिक केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

 आभासी पद्धतऐवजी केंद्रांवर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपस्थित राहावे लागणार आहे. मर्यादित वेळेत संपूर्ण प्रश्नपत्रिका लिखित स्वरूपात सोडविण्याचा सराव सुटल्यामुळे प्रारंभी परीक्षेसाठी वेळ पुरेल की नाही, अशी साशंकता विद्यार्थ्यांना होती. हे ध्यानात घेऊन मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून दिला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्यास वेळ वाढवून देण्यात आला आहे. ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटांचा वेळ, ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात येणार आहे. अपंग विद्यार्थ्यांना प्रतीतास २० मिनिटांचा अधिक वेळ देण्यात येणार आहे. याशिवाय शाळा तेथे परीक्षा केंद्र करण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य शाखेचे ७३ हजार ७७५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत. यासाठी मुख्य परीक्षा केंद्र (नियमित) १०३, एकूण उपपरीक्षा केंद्र अर्थात शाळा तिथे केंद्र अशी ४२० परीक्षा केंद्र आहेत.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

परीक्षा सुरू असताना कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथकांव्दारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात सात भरारी पथके गठित करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद निरंतर, जिल्हा परिषद प्राथमिक, महिला अधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य, ज्येष्ठ अधिविख्याता जिल्हा व प्रशिक्षण संस्था हे पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेवतील. परीक्षा केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे. परीक्षेनंतर नियमितपणे इतर वर्ग सुरू राहणार असल्याने र्निजतुकीकरण, स्वच्छता आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या काळात जर परीक्षार्थीस सर्दी, खोकला जाणवल्यास त्याला वेगळय़ा कक्षात ठेवण्यात येणार आहे.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल