सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पाणी आरक्षण बैठक झाली.
विविध संस्थांच्या पाणी आरक्षणास मान्यता
नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील पाणी पुरवठ्यासाठी ५ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. महापालिकेच्या मागणीनुसार गंगापूर व दारणा धरण समुहातून ५, ६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणास सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. धरण समूहनिहाय आरक्षण देण्यामागे लवचिकतेचे धोरण असून गरजेनुसार समुहातील कुठल्याही धरणातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पाणी आरक्षण बैठक झाली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, दिलीपराव बनकर, नितीन पवार,डॉ. राहुल आहेर,सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जलसंपदाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव उपस्थित होत्या. दरवर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी धरणातील पाण्याचे विविध प्रयोजनार्थ आरक्षण निश्चित केले जाते. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. महापालिका निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. पाणी आरक्षणात कपात वा तत्सम कुठलाही प्रयत्न राजकीयदृष्ट्या परवडणारा नाही. मराठवाड्याकडून मुकणे धरणातील नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणावर आक्षेप घेतला जात आहे. या छायेत झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग व शेतीसाठी असलेल्या पाणी मागणीची माहिती आहिरराव यांनी मांडली.
नाशिक शहरासाठी मुख्यत्वे गंगापूर धरण समूह व काही प्रमाणात दारणा धरण समूहातील मुकणे व दारणातून (चेहडी बंधाऱ्याद्वारे) पाणी पुरवठा केला जातो. आगामी वर्षासाठी महापालिकेने गंगापूर धरण समुहातून चार हजार दशलक्ष घनफूट, मुकणे धरणातून दीड हजार तर दारणेतून १०० दशलक्ष घनफूट अशाप्रकारे एकूण ५ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी केली होती. महापालिकेने केलेली मागणी मान्य करण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. धरण समुहातून हे आरक्षण दिले गेले असून महापालिकेला कोणत्या धरणातुन किती पाणी दयायचे, हे जलसंपदा विभाग निश्चित करेल. नाशिककरांना पाणी कमी पडणार नसल्याचे भुजबळ म्हणाले.
बैठकीत नाशिक महापालिकेसाठी १७०.३९ (दलघमी), मालेगाव महापालिका १२.११, त्र्यंबकेश्वर (एकुण) २.०६२, छावणी मंडळ २.८३०, लासलगावर,विंचूर व १६ गावे १.६८०, वावी व १० गावे १.३८८, ईगतपूरी (नगरपरिषद्) ४.९२२, नायगाव आणि नऊ गावे १.२२०, भगुर (नगरपरिषद) ०.९३० निफाड-कुंदेवाडी ०.६०३, मनमाड (नगर परिषद) १०.०५ येवला (नगर परिषद) ३.७१०, सटाणा (नगर परिषद) २.८३ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मंजुरी देण्यात आली.
मालेगावचे १०० कोटी पाण्यात ?
मालेगाव शहराला गिरणा धरणातुन ९०० दशलक्ष घनफूट पाणी उचलता यावे यासाठी पाणी पुरवठा योजनेवर १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीदेखील महापालिका गिरणा ऐवजी अन्य धरणातून पाणी मागत आहे. गिरणातून पाणी उचलण्याचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे केले जाते. पाणी उचलणे परवडणारे नव्हते तर १०० कोटी पाण्यात का घातले. असा प्रश्न पालकमंत्री भुजबळ यांनी केला. या योजनेविषयीची संपूर्ण माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.