एमबीबीएसला प्रवेश घेणारे सर्वात वयस्कर विद्यार्थी
ओडिशामधील एका ६४ वर्षीय व्यक्तीने एमबीबीएस म्हणजेच डॉक्टरीचा अभ्यास करण्यासाठी सरकारी वैद्यकीय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे. बुर्ला येथील वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्चमध्ये (व्हीआयएमएसएआर) जया किशोर प्रधान यांनी प्रवेश घेतला आहे. बारघर जिल्ह्यातील अट्टाबीर येथे राहणारे जया हे बँकेतून निवृत्त झालेले अधिकारी आहेत. जया यांना नवीन तरुणपणीच डॉक्टर व्हायचं होतं. मात्र त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. त्यामुळेच आता निवृत्तीनंतर त्यांनी नीटची परिक्षा दिली. विशेष म्हणजे या परिक्षेमध्ये त्यांना चांगले गूण मिळाले आणि त्यांनी डॉक्टर होण्यासाठी विद्यालयामध्ये प्रवेश घेतला आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो असं जया यांचं मत असल्याने त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केलीय.
जया हे स्टेट बँक ऑफ इंडियामधून उप शाखा प्रबंधक म्हणून निवृत्त झाले. “मी माझ्या इंटरमिडियेट सायन्सच्या परिक्षेनंतर मेडिकलची प्रवेश परीक्षा दिली होती. मात्र मला तेव्हा यश मिळालं नाही. नंतर मी बीएससी इन फिजिक्स केलं. त्यानंतर मी अट्टाबीर येथील एम. ई. स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करु लागलो. त्यानंतर मी इंडियन बँक आणि नंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १९८३ साली कामाला लागलो. मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचं माझं स्वप्न मी कधीच सोडलं नाही,” असं जया यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलातना सांगितलं.
“मी २०१६ साली निवृत्त झाल्यानंतर नीटची परीक्षा दिली. मी यावेळीही नीटची परीक्षा दिली आणि मला यश मिळालं. मला डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण करुन गरीबांना मोफत उपचार द्यायचे आहेत,” असं जया सांगतात. विशेष म्हणजे जया स्वत: दिव्यांग आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वयाची २५ ओलांडलेल्या व्यक्तींना नीटची परीक्षा देता येईल असा महत्वपूर्ण निकाल काही वर्षांपूर्वी दिल्याने आपल्याला ही परीक्षा देता आली असंही जया यांनी सांगितलं. “मी तर बँकेची नोकरी सोडून एमबीबीएसला प्रवेश घेण्याचाही विचार केला होता. मात्र आम्ही पाच भाऊ असून कौटुंबिक जबाबदारीमुळे मला तसं करता आलं नाही,” असंही जया यांनी सांगितलं.
व्हीआयएमएसएआरचे प्रमुख प्राचर्य असणाऱ्या ब्रिजमोहन मिश्रा यांनी एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना वय किती असावं यासंदर्भात कोणतंही बंधन नसल्याचं सांगितलं. तसेच जया हे या वर्षीपासून नियमितपणे इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अभ्याक्रम सुरु करतील असं सांगतानाच जया हे एमबीबीएसला प्रवेश घेणारे सर्वात वयस्कर विद्यार्थी ठरल्याची माहितीही मिश्रा यांनी दिली. अट्टाबीर येथील समाजसेवक असणाऱ्या राजेश अग्रवाल यांनी जया यांचं कौतुक केलं आहे. नीटची परीक्षा उत्तीर्ण होऊन जया यांनी आधीच विक्रम केला आहे. “ते तरुणांना प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व आहे. अनेक संकटांना तोंड देऊनही त्यांनी आपली शिकण्याची इच्छा सोडली नाही हे कौतुकास्पद आहे,” असं अग्रवाल म्हणाले.
जया प्रधान यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९५६ साली झाला आहे. त्यांना दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. सध्या त्यांची एक मुलगी बॅचरल ऑफ डेंटल सर्जरीचे (बीडीएस) शिक्षण घेत आहेत. दुसरी मुलगीही बीडीएसची विद्यार्थीनी होती. मात्र तिचे २० नोव्हेंबर रोजी निधन झालं. जया यांचा मुलगा दहावीला आहे. तुमच्या कुटुंबाने तुम्हाला या निर्णयामध्ये पाठिंबा दिला का असं विचारलं असता जया यांनी, “नुकतचं माझ्या मुलीचं निधन झाल्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसाल आहे. सर्वजण माझ्यापाठीशी ठामपणे उभे आहेत,” असं सांगितलं. जया यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास ते सर्वाधिक वय असणारे एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी ठरतील, असं काही जणाकार सांगतात.