प्रती महिना खर्चासाठी रक्कम मंजूर
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी दीड लाख रुपये देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने मंजुरी दिली आहे. लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुखदेखील आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मंजूर समितीने हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखवीला देण्यात येणाऱ्या प्रती महिना दीड लाखांमध्ये जेवण (५० हजार), औषधं (४५ हजार), सार्वजनिक गोष्टींचा वापर (२० हजार), वकिलांची फी (२० हजार) आणि वाहतूक (१५ हजार) यांचा समावेश आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर लखवीचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत करण्यात आला होता. २०१५ पासून तो जामीनावर बाहेर आहे. फक्त दाखवण्यापुरतं त्याला पाकिस्तानी जेमलध्ये ठेवण्यात आलं होतं. कारण रावळपिंडीमधील अदियाला जेलमध्ये असतानाही तो एका मुलाचा बाप झाला होता.
याशिवाय पाकिस्तानने अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांनाही प्रतीमहिना पैसे देण्याची विनंती संयुक्त राष्ट्राने मान्य केली आहे. त्यांनाही महिना दीड लाख रुपये दिले जाणार आहेत. पाकिस्तानच्या अॅटोमिक एनर्जी कमिशनसाठी काम केलेल्या बशीरुद्दीन यांनी अफगाणिस्तानात लादेनची भेट घेतली होती. नवाज शरीफ सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.