4 Days Week आता भारतीय कंपन्यांनाही सुरु करता येणार; पण…

केंद्राच्या नवीन कामगार नियमांमध्ये यासंदर्भातील मूभा देण्यात आलीय

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नवीन कामगार नियम (New Labour Codes) लागू करण्याची तयारी सुरु केली आहे. नवीन कामगार नियम  लागू झाल्यानंतर देशातील कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील चार दिवस कामावर बोलवण्याची मूभा असेल. म्हणजेच हे नियम लागू झाल्यानंतर परदेशाप्रमाणे भारतातही फोर डेज वीक सुरु करता येईल. त्याप्रमाणे कंपन्यांना राज्यस्तरीय विमा कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन घेण्याची मूभाही देण्यात येईल. मात्र फोर डेज वीक म्हणजेच आठवड्यातून चारच दिवस काम करण्याची सवलत देण्यात आली तरी आठवड्यात किमान ४८ तास काम करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास आठवड्यातील चार दिवस काम करुन तीन दिवस सुट्टी हवी असेल तर दिवसाला १२ तासांची शिफ्ट करावी लागणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव अपूर्वी चंद्रा यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

अपूर्वी चंद्रा यांनी, “आम्ही कामावर ठेवणाऱ्या कंपन्या किंवा कर्मचाऱ्यांवर दबाव आणू इच्छित नाही. त्यांना जो पर्याय योग्य वाटेल तो निवडण्याची मूभा त्यांना देण्यात आली आहे. कामाची बदलणारी पद्धत पाहून ही नवीन व्यवस्था उभारली जात आहे. आम्ही काही बदल करण्याचे प्रयत्न केले आहेत. कामाच्या दिवसांसंदर्भात आम्ही काही सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे,” अशी माहिती दिली. नवीन नियमांप्रमाणे तयार करण्यात आलेल्या नियमांचा कच्चा मसुदा तयार असून अंतिम मसुदा लवकर तयार होईल असा विश्वास चंद्रा यांनी व्यक्त केला आहे. हा मसुदा तयार करण्यामध्ये अनेक मोठ्या राज्यांनी हातभार लावल्याचंही चंद्रा यांनी स्पष्ट केलं.

हे वाचले का?  Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

“कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यामधील कामाचे दिवस हे पाच दिवसांपेक्षा कमी होऊ शकतात. चार दिवस काम केलं तर तीन दिवस सुट्टी दिली जाईल. यापूर्वीही आठवड्यामध्ये किमान ४८ तास काम केलं जावं अशी अट होती आणि ती आताही कायम ठेवण्यात आली आहे. कर्मचारी आणि कंपन्या या दोघांची सहमती असेल तर हे लागू करता येईल. मात्र हा नियम लागू केलाच पाहिजे असं कोणतही बंधन नसणार,” असंही चंद्रा यांनी सांगितलं आहे.

नवीन कामगार नियमांअंतर्गत श्रम मंत्रालयाने एक वेब पोर्टल तयार करत आहे. जून २०२१ पर्यंत असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार या पोर्टलवर नोंदणी करु शकतात. ही नोंदणी केल्यानंतर या कामगारांना अनेक सुविधा पुरवल्या जातील. यामध्ये प्रवासी मजूर, प्लॅटफॉर्म कामगार आणि इतर क्षेत्रातील कामागारांचा समावेश असेल. नवे नियम बनवण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती चंद्रा यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पुढील आठवड्यापर्यंत हे नवे नियम बनवून तयार होईल अशी अपेक्षाही चंद्रा यांनी व्यक्त केली. नवीन नियम बनवतानाही सर्व घटकांच्या हिताचा विचार केला जाईल. त्यानंतरच अंतिम नियम बनवून हे चारही वर्कर्स कोड लागू केले जातील, असं चंद्रा म्हणाल्या.