इंडिगोची सेवा विस्कळीतच, ३०० विमाने रद्द

इंडिगोची सेवा विस्कळीतच, ३०० विमाने रद्द
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 2 मिनिट )

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची विमानसेवा गुरुवारीही विस्कळीत राहिली. दिल्ली, मुंबई, बंगळूरु आणि अन्य विमानतळांवरून ३००पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. मनुष्यबळाच्या अभावामुळे विमानतळावरील कामकाजात अडथळे येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले असून सलग तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या शहरांमध्ये इंडिगोच्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

विमानांची उड्डाणे रद्द होण्याबरोबरच वेगवेगळ्या विमानतळांवर विमानांच्या उड्डाणांना विलंबही झाला. इंडिगोची विमानसेवा वेळेच्या खात्रीशीरपणामुळे प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ आणि वेळापत्रकात करावे लागणारे समायोजन यामुळे ही विमानसेवा विस्कळीत झाली आहे.

गुरुवारी दुपारपर्यंत इंडिगोची ३००पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली होती. दिल्ली विमानतळावर सर्वाधिक ९५ आणि त्याखालोखाल मुंबईतून ८५ विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले. हैदराबादमध्ये ७० आणि बंगळूरुमध्ये ५० विमाने रद्द झाली. त्याशिवाय अन्य विमानतळांवरही उड्डाणे रद्द झाल्यामुळे सर्वत्र प्रवाशांची गर्दी, गोंधळ आणि मनस्ताप असे चित्र दिसले.

बुधवारी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळूरु आणि हैदराबाद या सहा महत्त्वाच्या विमानतळांची आकडेवारी विचारात घेऊन इंडिगोचा काढलेला वक्तशीरपणा (ऑन टाइम परफॉर्मन्स) १९.७ टक्क्यापर्यंत खाली घसरल्याचे सांगण्यात आले. तो मंगळवारी ३५ टक्के इतका होता. या सर्वांचा परिणाम म्हणून गुरुवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या समभागांमध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली.