तपोवनातील वृक्षतोडीविषयी आंदोलकांकडून दिशाभूल

तपोवनातील वृक्षतोडीविषयी आंदोलकांकडून दिशाभूल
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 4 मिनिट )

तपोवनातील वृक्षतोडीच्या विषयात नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. प्रयागराज प्रमाणे नाशिकमध्येही साधुग्रामची जागा आधीपासून निश्चित आहे. तपोवनात १२ वर्षांपूर्वी जी वृक्ष होती, ती तोडली जाणार नाहीत. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी मागील कुंभमेळ्यात चांगले काम केले, असे प्रशस्तीपत्रक देत विविध आखाड्यांतील साधू-महंत, मठाधिपती, महामंडलेश्वर हे महापालिका आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.

वृक्षतोडीच्या मुद्यावरून वातावरण तापले असताना महापालिकेच्यावतीने सोमवारी आयोजित हरित नाशिक मोहिमेचा शुभारंभ कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आणि विविध आखाड्यांचे साधू-महंत यांच्या उपस्थितीत पार पडला. साधुग्राम उभारणीसाठी प्रस्तावित वृक्षतोडीवरून गदारोळ सुरू आहे. त्याची भरपाई करण्याच्या दृष्टीकोनातून शहरात मोठ्या वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

मखमलाबाद रस्त्यावरील भोईर मळा भागात झालेल्या कार्यक्रमास राहुल ढिकले, देवयानी फरांदे व सीमा हिरे या आमदारांसह महंत हरिगिरी महाराज, महंत भक्तीचरणदास महाराज, शंकरानंद महाराज, जनार्दन हरी महाराज, स्वामी भागवंतानंद आदी उपस्थित होते. या दिवशी मखमलाबाद रस्त्यावरील अडीच एकर जागा आणि गोदावरी किनारी सुयोजित प्रकल्पालगत विविध देशी प्रजातींच्या दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली. मोहिमेचा शुभारंभ करताना जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

See also  मुद्रांक शुल्क चुकवल्यास ६ महिने कारावास

यावेळी हरिगिरी महाराज यांनी मागील कुंभमेळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी चांगले काम केल्याचे नमूद करीत तपोवनातील आंदोलकांना सुनावले. कुंभमेळ्यात पर्यावरण व स्वच्छता दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या अनुषंगाने १५ हजार झाडांची लागवड केली जात आहे. तपोवनातील वृक्षांच्या प्रश्नांवर आंदोलक दिशाभूल करीत आहेत. जुनी झाडे तोडली जाणार नाहीत. साधुग्रामची कायमस्वरुपी जागा तपोवनात आहे. यावेळी साधुग्राम तिथेच होईल. कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या २५० किलोमीटरच्या परिघात विकास होत आहे. रामकुंड व कुशावर्त यांचे सारखे महत्व असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध महंतांनी वृक्षारोपण उपक्रमात सहभाग नोंदवला.

दरम्यान, आंध्र प्रदेशातील गोदावरीच्या अंतिम भागात असलेल्या राजमुद्री येथील रोपवाटिकेतून देशी प्रजातीची १० ते १५ फूट उंचीपर्यंतची झाडे उपलब्ध झालेली आहेत. टप्प्याटप्प्याने १५ हजार झाडांची लागवड करण्यास सुरुवात झाली. या उपक्रमात श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र, श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य स्वामी महाराज, श्री अण्णासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिव्हिंग, श्री स्वामीनारायण संस्थान, इस्कॉन आदी धार्मिक संस्थांनी सहभाग घेतला.

नाशिक शहरात १५ हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. याबरोबरच ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्यात येईल. त्यासाठी नाशिककरांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे झालेला मागील कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ आणि दुर्घटना विरहित झाला. त्याची जगाने दखल घेतली. आगामी कुंभमेळा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित आणि स्वच्छ राहील, अशी दक्षता घेतली जाईल. आई-वडिलांच्या नावाने एका रोपाची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. त्यासाठी नाशिककरांनी पुढे आले पाहिजे. एवढेच नव्हे तर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्यासाठी सामाजिक दायित्व निधीची मदत घेण्यात येईल, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

See also  नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अचानक थांबा