Afghanistan Crises: काबूल विमातळाजवळ पुन्हा रॉकेट हल्ला

काबूलच्या सलीम कारवान परिसरात सोमवारी सकाळी रॉकेट हल्ला झाला.

अमेरिका ३१ ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानमध्ये आपलं बचाव कार्य सुरू ठेवणार आहे. त्यापूर्वी एक दिवस आधीच राजधानी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील शेजारी रॉकेट हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. काबूलच्या सलीम कारवान परिसरात सोमवारी सकाळी रॉकेट हल्ला झाला. स्फोटानंतर लगेच गोळीबार देखील झाला आहे. पण हा हल्ला आणि गोळीबार कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

रविवारी दुपारी देखील काबूल विमानतळाच्या वायव्य भागात रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात तीन मुलं मारली गेल्याचं अफगाणी अधिकाऱ्याने सांगितलं. अफगाणिस्तानातून ३१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण सैन्य माघारी घेण्याच्या घोषणेनुसार अमेरिकेने आता त्याचा अखेरचा टप्पा सुरू केला आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तास्थापनेसाठी तालिबानी नेत्यांच्या हालचालींनीही वेग घेतला आहे.

इस्लामिक स्टेटचा आत्मघातकी हल्ला आणि अमेरिकेचं प्रत्युत्तर..

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी करण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात १६९ अफगाण नागरिक आणि १३ अमेरिकी सैनिकांचा बळी गेला होता. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आयसिसला हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला होता.  ‘आयसिस – के’ गटाचे संबंध पाकिस्तानच्या ‘आयएसआय’शी असल्याचे सांगण्यात येते.  ‘इस्लामिक स्टेट’च्या अफगाणिस्तानातील ‘आयसिस -के’ अर्थात ‘आयसिस खोरासन’ गटाने काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. अमेरिकी सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले की, नांगरहार प्रांतात आयसिस के गटाच्या ठिकाणांवर आम्ही स्वयंचलित विमानातून हल्ले केले. त्यात ड्रोनचाही वापर करण्यात आला.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?