Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

कोलकाता येथील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने सगळा देश हादरला, आता पश्चिम बंगाल सरकारने नवं विधेयक आणलं आहे.

पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसंच लैंगिक अत्याचार, शोषण आणि बलात्काराच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नवं विधेयक आणलं आहे. या विधेयकातली महत्त्वाची तरतूद म्हणजे बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीला फाशी दिली जाणार ही आहे. बलात्कार आणि शोषणाच्या घटनांच्या विरोधात हे विधेयक ( Aparajita Woman and Child Bill ) आणण्यात आलं आहे.

अपराजिता वुमन चाईल्ड बिल

अपराजिता वुमन चाईल्ड बिल असं या विधेयकाचं ( पश्चिम बंगाल गुन्हेगारी प्रतिबंध कायदा दुरुस्ती विधेयक २०२४ ) ( Aparajita Woman and Child Bill ) नाव आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. मागच्या महिन्यात ९ तारखेला आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. या प्रकरणानंतर आता कायदे कठोर करण्याच्या दृष्टीने ममता सरकारने हे नवं विधेयक ( Aparajita Woman and Child Bill ) आणलं आहे.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

विधेयकाच्या मसुद्यातल्या तरतुदी काय आहेत?

बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. ही शिक्षा त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या होत नाही तोपर्यंत असेल. त्याचप्रमाणे बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपींना फाशी दिली जाईल. बलात्कार प्रकरणाचा तपास अहवाल २१ दिवसांच्या आत आला पाहिजे अशीही तरतूद करण्यात आली आहे. जर २१ दिवसांत तपास पूर्ण झाला नाही तर तपास पूर्ण करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतच वाढवून मिळेल. या १५ दिवसांच्या कालावधीत जो तपास केला जाईल तो पोलीस अधीक्षक आणि त्यावरच्या पदावरचे अधिकारी यांच्या नेतृत्वातच केला जाईल. अशा तरतुदी या विधेयकात ( Aparajita Woman and Child Bill ) आहेत.

हे वाचले का?  PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा

अपराजिता टास्क फोर्सचं काम पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार

या विधेयकात बलात्काराचे खटले फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. महिला किंवा लहान मुलांवर अन्याय झाला, त्यांचं लैंगिक शोषण, बलात्कार हे झालं तर त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने हे विधेयक ( Aparajita Woman and Child Bill ) आणण्यात आलं आहे. तसंच अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करण्यासाठी अपराजिता टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे जी या प्रकारच्या प्रकरणांवर काम करते. या टास्क फोर्सचं काम पूर्वीप्रमाणे सुरु राहणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर ९ ऑगस्टच्या दिवशी बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर डॉक्टरांनी आंदोलनही केलं. तसंच आरोपी संजय रॉयला फाशी द्या अशीही मागणी केली. आता या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटल्यानंतर हे विधेयक पश्चिम बंगाल सरकारने आणलं आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार