Ashadhi Ekadashi : ‘बळीराजाचे दुःख दूर कर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुरायाला साकडं; अहिरे दाम्पत्याला महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : सलग तिसऱ्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्यानिमित्ताने पंढरपूरमधील शासकीय महापूजाला केली. यावेळी शिंदे कुटुंबातील चार पिढ्या पूजेला उपस्थित होत्या.

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “राज्यातील बळीराजाचे दुःख, कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचे सांगितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

मंडप आणि टोकन दर्शनासाठी १०३ कोटी रुपयांचा प्रकल्प

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनासाठी तिरुपती बालाजीच्या धरतीवर १०३ कोटी रुपयांचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे. या माध्यमातून भाविकांना विठुरायाचं सहज सुलभ दर्शन घेता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

नाशिकच्या अहिरे दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान

यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करणे हे आपले सौभाग्य असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी या पूजेनंतर व्यक्त केले.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

लाखो वारकरी पंढरपुरात दाखल

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी …प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे… या अभंगाप्रमाणे लाखो भाविक पंढरीला आषाढी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून भाविक मोठ्या संख्यने पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर संतांच्या पालख्या देखील पंढरपुरात पोहोचल्या आहेत. आषाढ दशमी म्हणजे मंगळवारी (१६ जुलै) पंढरी नगरीत जवळपास १२ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. आज (१७ जुलै) ही संख्या दुप्पट झाली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागा भाविकांनी भरली आहे.

हे वाचले का?  कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार