Asia Cup 2023: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! नसीम शाह आशिया कपमधून बाहेर, हारिस रौफबाबत सस्पेन्स कायम

Naseem Shah ruled out Asia Cup: पाकिस्तानला आशिया चषक २०२३ सुपर-४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे, मात्र त्याआधी स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Naseem Shah ruled out Asia Cup: पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह आशिया चषक २०२३च्या उर्वरित सर्व सामन्यांमधून बाहेर पडला आहे. वास्तविक, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नसीम शाह जखमी झाला, त्यानंतर त्याने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकातील फक्त दोन चेंडू टाकले आणि त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. आशिया चषक २०२३ सुपर-४ मध्ये, पाकिस्तानला १४ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध सामना खेळायचा आहे. पाकिस्तानसाठी हा सामना फायनलमध्ये जाण्यसाठी ‘करो या मरो’ या स्वरूपाचा असणार आहे. त्याआधी पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आशिया कप २०२३ सुपर-४ मध्ये भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह जखमी झाला होता. वास्तविक, नसीमने भारताविरुद्ध अतिशय शानदार गोलंदाजी केली होती. नसीम आपल्या स्पेलचे शेवटचे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याला फक्त दोन चेंडू टाकता आले. त्यानंतर अचानक त्याच्या पायात दुखायला लागेल आणि त्याने मैदान सोडले. अशा स्थितीत त्याने फलंदाजीही केली नाही. पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. कारण, जर पाकिस्तानला अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल तर लंकेविरुद्धचा विजय खूप महत्त्वाचा आहे.

हे वाचले का?  Kolkata Rape Case : पीडितेच्या शरीरावर १४ जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव तर गुप्तांगात आढळला चिकट द्रव्य; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर!

पाकिस्तानला सोमवारी भारताविरुद्ध २२८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३२ षटकात १२८ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानचे दोन फलंदाज हारिस रौफ आणि नसीम शाह फलंदाजीलाही आले नाहीत. दोन दिवस चाललेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नसीमने गोलंदाजी केली, पण हरिस गोलंदाजी करायला आलाच नाही. हे दोन्ही गोलंदाज या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसले. हारिस सध्या सर्वाधिक नऊ विकेट्स घेणारा गोलंदाज आहे, दुसरीकडे नसीमने सात विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, उर्वरित सामन्यांत पाकिस्तानला नसीम शाह दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.

हे वाचले का?  Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

भारताविरुद्धच्या सामन्यात हारिस आणि नसीम हे दोघे जखमी झाले होते. क्षेत्ररक्षण करताना नसीमच्या उजव्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली. दुसरीकडे हारिसच्या हाताला दुखापत झाली. भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात दोघेही संघर्ष करताना दिसले होते. त्यामुळे तो फलंदाजीलाही आला नाही. नसीम जरी स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी हारिस आशिया चषक स्पर्धेतील उर्वरित सामने खेळेल का, याबाबत शंका आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आशिया चषकाच्या उर्वरित सामन्यांसाठी नसीमच्या जागी दुसऱ्या खेळाडूची घोषणा केली आहे.

नसीमच्या जागी जमान आला

नसीमच्या जागी जमान खानची संघात निवड केली आहे. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने टी२० मध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. श्रीलंकेत तो पोहचला असून संघातही सामील झाला आहे. जमानने पाकिस्तानकडून सहा टी२० सामन्यांत चार विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट ६.६६ राहिला आहे. भारताविरुद्धच्या सुपर-४ सामन्याच्या राखीव दिवशी गोलंदाजी न करणाऱ्या हारिस रौफवरही नजर ठेवण्यात येत असल्याचे पीसीबीने म्हटले आहे. तो हळूहळू बरा होत आहे. टीमचे डॉक्टर सोहेल सलीम म्हणाले, “हे दोन वेगवान गोलंदाज आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि मेडिकल टीम वर्ल्ड कपपूर्वी त्यांची चांगली काळजी घेत आहे.”

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”