BBC Documentary : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून गुजरात दंगलीवरील माहितीपटाचं स्क्रीनिंग; प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश

‘बीबीसी’ने नुकताच गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे.

‘बीबीसी’ने नुकताच गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या माहितीपटावरून देशातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणली असली तरीही हैदाराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून या माहितीपटाचं स्क्रीनिंग केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे वाचले का?  Kolkata Rape Case : पीडितेच्या शरीरावर १४ जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव तर गुप्तांगात आढळला चिकट द्रव्य; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर!

विद्यार्थ्यांनी आरोप फेटाळले

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने बीबीसीच्या माहितीपटावर बंदी आणल्याच्या दुसऱ्या दिवशी हैदराबाद विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी गुजरात दंगलीवरील माहितीपटाचे स्क्रीनिंग केल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांकडून हे आरोप फेटळण्यात आले आहेत. केंद्र सरकारने बंदी घालण्याच्या दोन दिवसांपूर्वी आम्ही या माहितीपटाचे स्क्रीनिंग करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंद झाली नसल्याची माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

केंद्र सरकारकडून माहितीपटावर बंदी

बीबीसीच्या माहितीटावरून भारतात राजकीय पडसाद उमटल्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार हा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी आयटी नियम, २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत निर्देश जारी केले आहेत.