उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : राज्यात विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आतापासून कंबर कसली आहे. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत “एकतर तू राहशील किंवा मी राहिल”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरेंनी आधी पक्ष वाचवावा, उरली सुरलेली शिवसेना वाचवावी आणि नंतर दिल्ली पाहावी”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“ठाकरे गटाने उरली सुरलेली शिवसेना आहे, ती वाचवावी. दिल्ली खूप लांब आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केलेली आहे, त्यामधून ते किती गोंधळलेले आहेत हे दिसत आहे. आज राज्य सरकार कल्याणकारी योजना आणत आहे. विकासाची कामे करत आहे. त्यामुळे सर्व विरोधक गोंधळलेले आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
“राजकारणात अशी भाषा बोलणं म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दिसतं आहे. यामधूनच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत असं वक्तव्य केलेलं आहे. पण आधी तर त्यांनी त्यांचा पक्ष वाचवावा आणि नंतर दिल्ली पाहावी. हे खरं म्हणजे वैचारीक दिवाळखोरी आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राने याआधी पाहिलेलं नाही. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर टीका करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
शिंदे पुढं म्हणाले, “कोणीही कोणाला संपवण्याची भाषा करु नये. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. मीच नाही तर महाराष्ट्र देखील त्यांच्या पाठीशी आहे. आज जे आव्हानाची भाषा करतात ती भाषा करत असताना आपण कुठं आहोत, हे पाहिलं पाहिजे. संपवण्याची भाषा करण्यासाठी मनगटात दम लागतो. मनगटात जोर असावा लागतो. फुकटच्या बाता मारून कोणी कोणाला संपवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आरोप करत राहा. आम्ही त्या आरोपाला कामाने उत्तर देऊ”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
उद्धव ठाकरे फडणवीसांना काय म्हणाले होते?
मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. “मला आणि आदित्यला अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसं रचलं गेलं होतं, हे अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो. त्यामुळे आता राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन. आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही. पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी त्यांना आव्हान देत आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.