देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाखांवर
देशात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ८१ हजार ४४६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाखांवर पोहोचली आहे. एका दिवसात नोंद होणारी ही गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. याआधी ११ ऑक्टोबरला ७४ हजार ३८३ रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या २४ तासात ५० हजार ३५६ जण उपचारानंतर बरे झाले असून ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ३ हजार १३१ इतकी झाली आहे. तर १ कोटी १५ लाख २५ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ६ लाख १४ हजार ६९६ अॅक्टिव्ह केसेस असून मृतांच्या संख्या १ लाख ६३ हजार ३९६ इतकी झाली आहे. दुसरीकडे देशात आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेशात सलग करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. करोना रुग्णवाढीत महाराष्ट्र आघाडीवर असून लवकरच ठाकरे सरकाकडून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने आरटी-पीसीआर टेस्टचा दर १००० वरुन ५०० वर आणला आहे.
राज्यात ४३,१८३ नवे रुग्ण, २४९ जणांचा मृत्यू
दैनंदिन रुग्णवाढीने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत राज्यात ४३,१८३ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक ८,६४६ नवे रुग्ण मुंबईत आढळले. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३,६६,५३३ झाली आहे. त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील ५४,८०७ रुग्णांचा समावेश आहे.