Corona update : चिंता वाढली; गेल्या २४ तासांत ८१७ करोनाबाधितांचा मृत्यू तर, ४५,८९२ नव्या बाधितांची नोंद

नव्या करोना बाधितांच्या तुलनेने रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे.

देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता करोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे करोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८१७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ही आकडेवारी ५०० पेक्षा ही कमी होती. मात्र अचानक मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत ४५,८९२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४५,८९२ नवीन करोना बाधित आढळून आले आहेत आणि ८१७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी दिवसभरात ४४,२९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

देशात नव्या करोना बाधितांच्या तुलनेने रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे. काही दिवसांपर्यंत करोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक होते. ७ जुलै पर्यंत देशभरात ३६ कोटी ४८ लाख करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. बुधवारी ३३ लाख ८१ हजार लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर आतापर्यंत सुमारे ४२ कोटी ५२ लाख करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी सुमारे १९ लाख करोना नमुना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा पॉझिटिव्हीटी दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

हे वाचले का?  Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला

देशात आतापर्यंत ३ कोटी ७ लाख ९ हजार ५५७ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर २ कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्या ४ लाख ६० हजार ७०४ करोनाबाधित उपचाराधिन आहेत. तर आतापर्यंत ४ लाख ५ हजार २८ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”

देशातील करोना मृत्यूचे प्रमाण १.३२ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्ण २ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण बाधितांच्या बाबतीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.

महाराष्ट्रात ९,५५८ नवे बाधित,आणखी १४७ रुग्णांचा मृत्यू

बुधवारी महाराष्ट्रात ९,५५८ नवे करोना बाधित आढळून आले आहेत तर १४७ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या ६१ लाख २२ हजार ८९३ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या १ लाख १४ हजार ६२५ रूग्ण उपचार घेत आहेत.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

महाराष्ट्रातील संसर्गाचा दर हा १४.२ टक्के आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार मुंबईत बुधवारी ६६२ नवीन रुग्णांची नोंद केली गेली असून आणखी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला.