रविवारी देशात ३५ हजार ४९९ नवीन रुग्ण आढळले असून ४४७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देशात करोनाची तिसरी लाट लवकरच येणार असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय. तिसऱ्या लाटेची चाहूल असली तरी गेल्या २४ तासांत करोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. रविवारी देशात ३५ हजार ४९९ नवीन रुग्ण आढळले असून ४४७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ३९ हजार ६८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात करोनाची रुग्णसंख्या ९ टक्क्यांनी कमी झाली आहे.
४४७ रुग्णांच्या मृत्यूसह आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख २८ हजार ३०९ झाली आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी ११ लाख ३९ हजार ४५७ झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.४० टक्क्यांवर आहे. तर, विकली पॉझिटीव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी असून तो २.३५ टक्के आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट २.५९ टक्के आहे. हा दर गेल्या १४ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
दरम्यान लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या २४ तासांत १६ लाख ११ हजार ५९० जणांना लस देण्यात आली असून आतापर्यंत ५० कोटी ८६ लाख नागरिकांचं लसीकरण झालंय. आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ५२ कोटी ४० लाख लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. तर अजूनही २ कोटी ३३ लाख ५५ हजार डोसेस उपलब्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय.