Corona Update : २८७ दिवसांनंतर सर्वात मोठा दिलासा; देशात २४ तासांत केवळ ८८६५ नवीन रुग्णांची नोंद

गेल्या २४ तासांत करोनामुळे १९७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ११,९७१ लोक बरे होऊन घरी परतले आहेत.

२८७ दिवसांनंतर भारतात करोना विषाणीची लागण झाल्याची सर्वात कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८८६५  रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, सोमवारी १०,२२९ करोना रुग्ण आढळले होते. तर देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १,३०,७९३ वर आली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे १९७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ११,९७१ लोक बरे होऊन घरी परतले आहेत.

आकडेवारीनुसार, देशातील दैनंदिन संसर्ग दर ०.८० टक्क्यांवर घसरला आहे, जो गेल्या ४३ दिवसांपासून दोन टक्क्यांच्या खाली राहिला आहे. तसेच साप्ताहिक संसर्ग दर ०.९७ टक्के आहे, जो ५३ दिवसांपासून दोन टक्क्यांवरून खाली आला आहे.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १६ नोव्हेंबरपर्यंत देशभरात करोना लसीचे ११२ कोटी ९७ लाख ८४ हजार डोस देण्यात आले आहेत. सोमवारी ५९.७५ लाख लसीकरण करण्यात आले. त्याच वेळी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, आतापर्यंत सुमारे ६२.५७ कोटी करोना चाचण्या झाल्या आहेत. तर सोमवारी सुमारे ११.०७ लाख करोना नमुना चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

हे वाचले का?  Olympics 2024 : भारताला आज तीन पदकांची आशा; महाराष्ट्राचा नेमबाज अंतिम फेरीत, चालण्याच्या स्पर्धेत तिघांची फायनलमध्ये धडक

करोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३ कोटी ४४ लाख ५६ हजार लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी चार लाख ६३ हजार ८५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३८ लाख ६१ हजार लोक बरे झाले आहेत. देशातील करोना सक्रिय रुग्णांची संख्या १.५ लाखांवर आली आहे. एकूण १ लाख ३० हजार ७९३ जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, केरळमध्ये करोना संसर्गाची सर्वात वाईट स्थिती आहे. गेल्या २४ तासांत ८,८६५ बाधितांची नोंद झाली असून, त्यापैकी ४५४७ एकट्या केरळमध्येच आहेत. केरळमध्ये गेल्या २४ तासांत ५७ जणांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचले का?  ११ हजार उच्चशिक्षित पोलीस भरतीच्या शर्यतीत….