Corona : शिर्डीत दर्शनासाठीची वेळ बदलली; ‘या’ वेळेतच घेता येणार दर्शन!

शिर्डी देवस्थानने अहमदनगरमध्ये लागू करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दर्शनाची वेळ बदलली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिर्डीमधील साई संस्थानने साई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा नियम बदलले आहेत. आता सकाळी ६ ते रात्री ९ या काळातच साई भक्तांना दर्शन घेता येणार असून रात्री ९ ते सकाळी ६ अशा ९ तासांसाठी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केल्यामुळे शिर्डी देवस्थानने हा निर्णय घेतल्याचं देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचले का?  सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन

राजधानी दिल्लीमध्ये करोनाची दुसरी लाट आली असून या पार्श्वभूमीवर देशाच्या इतर भागात देखील बाधितांचा आकडा वर जाऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांमध्ये सापडलेला करोनाचा नवा स्ट्रेनदेखील भारतात काही राज्यांमध्ये सापडला आहे. हे बाधित लागलीच शोधून त्यांना क्वारंटाईन केले असले, तरी देशातले इतर करोनाबाधित वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात देखील हेच चित्र असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून अहमदनगरमधील नाईट कर्फ्यू हा त्याचाच एक भाग आहे.