Coronavirus : महाराष्ट्रात रुग्णघट

आठवडय़ात दुसऱ्यांदा ५० हजारांखाली; मुंबई, ठाण्यालाही दिलासा

आठवडय़ात दुसऱ्यांदा ५० हजारांखाली; मुंबई, ठाण्यालाही दिलासा

मुंबई : राज्याचा रुग्णआलेख घसरणीला लागला असून, रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या ५० हजारांखाली नोंदविण्यात आली. मुंबई, ठाण्यासह अनेक मोठय़ा शहरांत लक्षणीय रुग्णघट होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे.

राज्यात रविवारी करोनाचे ४८,४०१ रुग्ण आढळले, तर ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात तीन लाख नमुन्यांची चाचणी के ल्यानंतर शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्या पाच हजारांनी घटली. गेल्या सोमवारी राज्यात ४८,६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

एप्रिल महिन्यात राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी ६३ हजार होती. ती आता कमी होऊ लागली आहे. राज्यात सध्या ६ लाख १५ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईमधील करोनावाढीचा सरासरी दर रविवारी ०.४४ टक्क्य़ांपर्यंत घसरला. मुंबईत रविवारी २,४०३ जणांना करोनाची लागण झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत दिवसभरात ३,३७५ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत मुंबईतील सहा लाख १३ हजार ४१८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला ४७ हजार ४१६ करोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मुंबईमधील रुग्णदुपटीचा कालावधी १५३ दिवसांवर पोहोचला आहे.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट होण्याचा कल रविवारीही कायम होता. ठाणे जिल्ह्यात रविवारी १ हजार ७५२ करोनाबाधित आढळले, तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला.

‘माझा डॉक्टर’ बनण्याचे आवाहन

मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यभरातील डॉक्टरांशी संवाद साधला. करोनाची लाट रोखण्यासाठी ‘माझा डॉक्टर’ बनून मैदानात उतरण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या अभिनव उपक्रमास वैद्यकीय क्षेत्राकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी अशाच प्रकारे आयोजित एका कार्यक्रमात मुंबईतील ७०० डॉक्टरांनी करोना रोखण्यासाठी मैदानात उतरण्याची ग्वाही दिली. –

हे वाचले का?  अतिवृष्टीमुळे रायगडला पुराचा तडाखा; महाड, रोहा, पाली, नागोठणे येथे पूरस्थिती