Coronavirus : राज्यात दिवसभरात ८ हजार १५९ नवीन करोनाबाधित, १६५ रूग्णांचा मृत्यू

आज राज्यात ७ हजार ८३९ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. रोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. काल करोनामुक्त झालेल्यांची संख्या ही करोनाबाधितांपेक्षा जास्त होती. तर, आज पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या करोनातून बरे झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे.  मागील २४ तासांत राज्यात ८ हजार १५९ नवीन करोनाबाधित आढळले असून, ७ हजार ८३९ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात आज १६५ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,०८,७५० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,३०,९१८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६०,६८,४३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,३७,७५५ (१३.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,५२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,७४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.