चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे, जगभरात चिंता
चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत असून यामुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे. चीनमध्ये करोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाल्याचं अनधिकृतरित्या सांगण्यात येत आहे. दरम्यान कमी प्रमाणात झालेलं लसीकरण तसंच प्रतिकारशक्तीचा अभाव या पार्श्वभूमीवर चीनने अवलंबलेलं ‘शून्य कोविड’ धोरण (झिरो कोविड) शिथील केल्यास १० ते २० लाख लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. लंडनमधील जागतिक आरोग्याशी संबंधित कंपनी Airfinity ने हा अहवाल जारी केला आहे.
“चीनमधील लोकांमध्ये फार कमी प्रतिकारशक्ती आहे. तेथील नागरिकांना स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात आलेल्या Sinovac आणि Sinopharm या लसी देण्यात आल्या आहेत. या लसी संसर्ग आणि मृत्यू रोखण्यात तितक्या कार्यक्षम नाही आहेत,” असं अहवालात सांगण्यात आलं आहे.
चीनमधील शून्य कोविड धोरण याचा अर्थ तेथील लोकांमध्ये पूर्वीच्या संसर्गातून कोणतीही नैसर्गिक प्रतिकारशत्ती निर्माण झालेली नाही असाही अहवालात उल्लेख आहे.
“हाँगकाँगमध्ये फेब्रुवारी महिन्यात आलेली तशीच करोनाची लाट चीनमध्ये आल्यास आरोग्य यंत्रणेवर क्षमतेपेक्षा प्रचंड दबाव येईल आणि देशभरातून १६ ते २७ कोटी प्रकरणं समोर येऊ शकतात. ज्यामुळे १३ ते २१ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो,” असंही अहवालात सांगितलं आहे.
Airfinity चे डॉक्टर लुईस ब्लेअर यांनी म्हटलं आहे की “शून्य कोविड धोरण रद्द करण्याआधी चीनने लसीकरण वाढवत लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षात घेता याची जास्त गरज आहे. तसंच भविष्यातील करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांमध्ये हायब्रीड इम्युनिटी निर्माण झाली पाहिजे”.
सोमवारी चीनमधील आरोग्य प्रशासनाने बिजिंगमधील दोन नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. चीनमध्ये ४ डिसेंबरपासून करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. या मृत्यूंमुळे, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने गेल्या तीन वर्षांत चीनमध्ये कोविड-१९ मुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या पाच हजार २३७ वर गेली आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण तीन लाख ८० हजार ४५३ करोना रुग्णसंख्या नोंदवली गेली.
नववर्षांच्या गर्दीची चिंता, अपुऱ्या आरोग्य सुविधा
जानेवारीत चीनमध्ये नवीन चांद्र वर्षांच्या प्रारंभानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. या काळात स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परततील. या काळात उसळलेल्या गर्दीत करोना प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढण्याचा धोका आहे. तसेच लहान शहरे व ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर ताण येईल. या सुविधा अपुऱ्या पडण्याची चिंता प्रशासनास सतावत आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात रुग्णालय संख्या वाढवली आहे. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त आजारी कर्मचाऱ्यांचा अपवाद केला गेला आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी गंभीर आजारी असल्याशिवाय रुग्णालयात दाखल न होण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.