Covid Variant BF.7: चीनमध्ये करोनाचं थैमान! भारतात नव्या व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळल्याने चिंता; मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतात तीन रुग्ण, केंद्र सरकारकडून उपाययोजना

चीनसह अन्य देशांत पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर, लसीकरण पूर्ण करण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना दिला. दरम्यान पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी देशातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

चीनमध्ये मोठी रुग्णवाढ नोंदविणाऱ्या ओमायक्रॉनच्या ‘बीएफ.७’ या उपप्रकाराचे भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओदिशामध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे. यानंतर ही उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

चीनमध्ये करोनाच्या नव्या उत्परिवर्तनामुळे मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी तज्ज्ञांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ‘‘करोनासाथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी करोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे’’, असे मंडाविया यांनी सांगितले.

जास्तीत जास्त करोना रुग्णांचे नमुने जनुक्रीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्याची सूचनाही आरोग्यमंत्री मंडाविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली. चीनसह अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने विमानतळावर तपासण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. देशातील २७-२८ टक्के पात्र नागरिकांनी करोनाची वर्धक मात्रा घेतली आहे, याकडे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी बैठकीतील उपस्थितांचे लक्ष वेधले. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीच्या वापराचा आग्रह त्यांनी धरला.

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा

देशात सध्या करोनाचे ३,४०८ उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात करोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी चीनसह अन्य देशांत मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात करोनाचे सरासरी ५.९ लाख दैनंदिन रुग्ण आढळत आहेत.