देशात जिवघेण्या करोना विषाणूची नवीन प्रकरणे कमी होत आहेत. परंतु आता करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशात जिवघेण्या करोना विषाणूची नवीन प्रकरणे कमी होत आहेत. परंतु आता करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आता केवळ केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांपुरती मर्यादीत नाहीत. तर इतर राज्यात देखील याचा फैलाव होत आहे. त्यामुळे केंद्राने खबरदारीचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस’चे रुग्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, जम्मू आणि कर्नाटकात आढळले आहेत.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस प्रकार चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यांनी जागरुक राहण्याची गरज आहे, तसेच प्रतिबंधावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. या प्रकाराबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश सरकारलाही पत्र लिहिले आहे.
भारताव्यतिरिक्त आणखी नऊ देशांत डेल्टा प्लस प्रकार आढळला आहे. अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया येथे ‘डेल्टा प्लस’ प्रकार आढळून आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ राज्यांनी याबाबत खबरदारीसहीत योग्य निर्णय घ्यावा, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात २१ रुग्ण
सध्या महाराष्ट्रात २१ रुग्ण, मध्य प्रदेश ६, केरळ ३, तामिळनाडू ३, कर्नाटक २, आंध्र प्रदेश १, पंजाब १, जम्मू १ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे.
‘डेल्टा प्लस’चे रत्नागिरीत नऊ, जळगावमध्ये सात, मुंबईत दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीत सुरुवातीला सहा रुग्णांमध्ये ‘डेल्टा प्लस’ आढळले होते. त्यानंतर ५० जणांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले होते. त्यातून आणखी तीन जणांमध्ये हा विषाणू आढळला असून रत्नागिरीत या विषाणूचे सध्या नऊ रुग्ण झाले आहेत.
‘भय बाळगू नये’
करोनाच्या विषाणूचे उत्परिवर्तन होणे नैसर्गिक आहे. ‘डेल्टा’ किंवा ‘डेल्टा प्लस’ या उत्परिवर्तित प्रकारांचा धोरणात्मक दृष्टीने अभ्यास होणे गरजेचे आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांनी याचे भय बाळगू नये. करोनाच्या कोणत्याही उत्परिवर्तित विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मुखपट्टीचा वापर, अंतर नियम, हातांची स्वच्छता हेच करोना प्रतिबंधात्मक उपाय आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता या उपायांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.