Dhananjay Munde Controversy: “मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा…”, सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांना केलं आवाहन!

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गेल्या २८ दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा आहे. त्या कुटुंबाचे अश्रू पाहून अस्वस्थ वाटतं. या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा”.
Supriya Sule Speaks on Dhananjay Munde: महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे असल्याची टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडेंच्याच बंगल्यावर खंडणीसंदर्भातली बोलणी झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. या सर्व प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाल्मिक कराडवर खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात भाजपा आमदार सुरेश धस यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. तसेच, नुकताच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. सरपंच हत्या प्रकरणातील खंडणीची सगळी चर्चा ही धनंजय मुंडेंच्याच बंगल्यावर झाली होती, असा जाहीर आरोप त्यांनी केला असून सीडीआर रिपोर्टमध्ये हे समोर येईल, असंही म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून त्यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी सूचक विधान केलं आहे.

हे वाचले का?  “ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…”, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…

सुप्रिया सुळेंनी दिलं अशोक चव्हाणांचं उदाहरण!

सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांचं उदाहरण दिलं आहे. “धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकारनं संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय, जेव्हा अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले तेव्हा नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे वाचले का?  Arvind Kejriwal : “भाजपाच्या चुकीच्या कामांना RSSचा पाठिंबा आहे का?”, केजरीवालांचा मोहन भागवतांना सवाल; भाजपाने दिलं प्रत्युत्तर

“गेल्या २८ दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा आहे. त्या कुटुंबाचे अश्रू पाहून अस्वस्थ वाटतं. या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. काल मुख्यमंत्र्यांचं विधान आलंय की कुणालाही सोडणार नाही. पोलिसांनी ज्या प्रकारची भाषा बजरंग सोनावणेंबाबत वापरली किंवा अंजली दमानिया किंवा सुरेश धस ज्या गोष्टी बोलत आहेत त्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. असं कसं चालणार? कुठल्याही गोष्टीमध्ये काही विषय असे असतात की ज्यात राजकारण बाजूला ठेवूनच काम करावं लागतं. या राज्यात माणुसकी आहे की नाही? त्या कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने न्याय मिळायलाच पाहिजे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

या सगळ्यात एक आशेचा किरण आहे – सुप्रिया सुळे

“या सगळ्यात आशेचा किरण एकच आहे की फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतभरातली माध्यमं या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. सर्व पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले आहेत हे महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे हे दर्शवत आहे. आता काय निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचंय”, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस यांना केलं.