दोन्ही उमेदवारांचे काहिसे सारखे नाव व चिन्ह यामुळे मतदारांमध्ये संभ्रम उडाल्याची परिणती खऱ्या शिक्षकाचे मताधिक्य घटण्यात झाली.
नामसाधर्म्य, तुतारी चिन्हामुळे मतदारांचा गोंधळ
नाशिक – नामसाधर्म्य आणि तुतारी चिन्हाच्या बळावर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तिसरी उत्तीर्ण असणारे अपक्ष उमेदवार बाबू भगरेंनी (सर) एक लाखहून अधिक मते मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या मताधिक्याला सुरुंग लावल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही उमेदवारांचे काहिसे सारखे नाव व चिन्ह यामुळे मतदारांमध्ये संभ्रम उडाल्याची परिणती खऱ्या शिक्षकाचे मताधिक्य घटण्यात झाली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह आहे. त्यावर भास्कर भगरे निवडणूक लढले. तर याच मतदारसंघात रिंगणात असणारे बाबू सदू भगरे (सर) यांचे तुतारी चिन्ह होते. भगरे हे आडनाव, पुढे (सर) ही ओळख आणि तुतारी चिन्ह यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी आधीच वाढली होती. त्याचे प्रत्यंतर प्रत्यक्ष निकालातून समोर आले. आदिवासी व शेतकरीबहुल मतदारसंघात दोन्ही उमेदवारांची नाव व चिन्हात असणारी समानता मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ठरली. या मतदारसंघात एकूण १० उमेदवार होते. यात भास्कर भगरेंप्रमाणे महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या नावाशी काहिसा साधर्म्य असणारे बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे भारत पवार नामक उमेदवारही रिंगणात होते. त्यांचे ॲटो रिक्षा हे चिन्ह होते. बसपाचे तुळशीराम खोटरे (हत्ती), किशोर डगळे (कोट), गुलाब बर्डे (बॅट), मालती ठोमसे (गॅस सिलिंडर), अनिल बर्डे (कुलर), जगताप दीपक (शिट्टी) या चिन्हांवर मैदानात होते. उमेदवारांकडून पसंतीक्रम घेऊन चिन्हांचे वाटप झाल्याचा दावा तेव्हा निवडणूक यंत्रणेने केला होता.
राष्ट्रवादी शरद पवार गटासह अन्य अपक्ष उमेदवारांना संपूर्ण मतदारसंघात अल्पावधीत चिन्ह पोहोचण्याची धडपड करावी लागली. परंतु, तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हामुळे महाविकास आघाडीच्या प्रचारासोबत अपक्ष बाबू भगरे यांच्या तुतारीचाही आपसूक प्रचार झाला. त्यामुळे प्रचारात कुठेही न दिसलेल्या बाबू भगरेंनी एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मिळणार नाहीत, इतकी मते खेचत विक्रम रचला. त्यांना २५ व्या फेरीअखेर एक लाख तीन हजार २९ मते मिळाली. याचा महाविकास आघाडीच्या भास्कर भगरेंना फटका बसला. ॲटोरिक्षा या चिन्हावर रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीतर्फे निवडणूक लढणाऱ्या भारत पवारांना पाच हजार ६०३ मते मिळाली. नामसाध्यर्माची तशी झळ महायुतीला बसली नाही.
बाबू भगरे तिसरी पास
तब्बल एक लाखहून अधिक मते मिळविणारे अपक्ष उमेदवार ६८ वर्षीय बाबू भगरे हे एकलहरेतील गंगावाडी येथील रहिवासी आहेत. इयत्ता तिसरीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले आहे. माडसांगवीच्या प्राथमिक विद्या मंदिरात त्यांनी शिक्षण घेतले. नोकरी करणाऱ्या भगरेंविरुध्द कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल नाही. मतपत्रिकेवर आपले नाव कसे हवे, हा पर्याय उमेदवारांना अर्ज भरून निवडता येतो. त्या अंतर्गत भगरेंनी आपल्या नावासमोर (सर) अशी जोड दिल्याचे सांगितले जाते. इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण झालेल्या बाबू भगरेंनी मूळ शिक्षक पेशात असणाऱ्या महाविकास आघाडीच्या भास्कर भगरेंच्या मतांना सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.