Drishti IAS Institute : विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर कारवाई, महापालिकेने लावलं सील; कारण काय?

Drishti IAS Institute Sealed : दिल्ली महानगरपालिकेने संपूर्ण शहरातील कोचिंग सेंटर्सची तपासणी सुरू केली आहे.

Drishti IAS Institute MCD Sealed Classes in Basement : दिल्लीतल्या जुन्या राजेंद्र नगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचं पाणी शिरून यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राजधानी हादरली आहे. दरम्यान, या घटनेमुळे दिल्ली महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं असून त्यांनी अनेक इमारतींची तळघरं, प्रामुख्याने ज्या इमारतींमध्ये कोचिंग सेंटर्स (शिकवणी वर्ग) चालवले जातात अशा इमारतींची तळघरं सील केली आहेत. यामध्ये यूपीएससीची शिकवणी घेणारे प्रसिद्ध शिक्षक विकास दिव्यकीर्ती यांच्या दृष्टी आयएएस या कोचिंग सेंटरचाही समावेश आहे. दिल्लीमधील नेहरू विहारमधील वर्धमान मॉलच्या तळघरात दृष्टी आयएएसचे शिकवणी वर्ग घेतले जात होते. सुरक्षेच्या कारणास्तव हे तळघर सील करण्यात आलं आहे.

हे वाचले का?  पक्षपातावरून खडाजंगी; अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुल्लेखामुळे ‘इंडिया’ आघाडी आक्रमक

दिल्ली महानगरपालिकेने संपूर्ण शहरातील कोचिंग सेंटर्सची तपासणी सुरू केली आहे. सोमवारी (२९ जुलै) दिल्लीमधील मुखर्जी नगरमधील इमारतींची तळघरं सील करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. राजेंद्र नगरप्रमाणेच मुखर्जी नगरमध्ये देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे अनेक शिकवणी वर्ग (कोचिंग सेंटर्स) चालवले जातात. दिल्ली महापालिकेने प्रामुख्याने राजेंद्र नगर व मुखर्जी नगर परिसरात असुरक्षित तळघरं सील करण्याची मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत दृष्टी आयएएस इन्स्टीट्युट, वाजी राम आयएएस इन्स्टीट्युट, वाजीराम आणि रवी इन्स्टीट्युट, वाजीराम आणि आयएएस हब, श्रीराम आयएएस इन्स्टीट्युटवर कारवाई करण्यात आली आहे. या कोचिंग इनस्टिट्युटचे शिकवणी वर्ग वेगवेगळ्या इमारतींच्या तळघरात चालवले जात होते.

हे वाचले का?  Patanjali Ayurved : बाबा रामदेव यांच्यावरील ‘तो’ खटला अखेर संपला; पण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी संपवताना दिली तंबी!

पोलीस बंदोबस्तात कारवाई

दिल्ली महापालिकेचं एक पथक सोमवारी सकाळी साडेदवा वाजण्याच्या सुमारास मुखर्जी नगरमधील नेहरू विहारमध्ये दाखल झालं. येथील वर्धमान मॉलच्या तळघरात दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरद्वारे शिकवणी वर्ग भरवले जातात. महापालिकेने हे तळघर सील केलं आहे. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर पोलिसांचंही एक पथक दाखल झालं होतं.

नेमकं प्रकरण काय?

तीन दिवसांपूर्वी दिल्लीत मुसळधार पाऊस झाला. दिल्लीतल्या अनेक भागात पावसाचं पाणी साचलं होतं. राजेंद्र नगर भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. दरम्यान, राजेंद्र नगर येथील Rau’s आयएएस इन्स्टिट्युटमच्या तळघरात पाणी शिरलं. येथे यूपीएससीचे शिकवणी वर्ग चालू होते. मात्र या वर्गाच्या बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा होता जो बायोमेट्रिक पद्धतीने उघडता येत होता. मात्र तळघरात पाणी शिरल्यानंतर हा दरवाजा उघडता येत नसल्याने अनेक विद्यार्थी आत अडकले. यापैकी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्ली महापालिकेने वेगवेगळ्या इमारतींची तळघरं सील केली आहेत.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?