शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेत आला आहे. विद्यमान सत्ताधारी महायुतीनं निवडणुकांच्या काळात कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार ती करावी, या मागणीसाठी बच्चू कडूंनी नागपूरपर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. अखेर बुधवारी सरकारशी झालेल्या वाटाघाटींनंतर पुढील वर्षी ३० जूनपर्यंत कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंना दिला. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी चर्चेत आलेला असतानाच अजित पवारांनी याबाबत केलेलं एक विधान वादात सापडलं आहे.
शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांनी सारखंच कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये, असं आवाहनदेखील अर्थखात्याची जबाबदारी असणाऱ्या अजित पवारांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना केलं आहे. शुक्रवारी बारामतीमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी केलेल्या या विधानावरून आता वाद निर्माण झाला आहे.
“कर्जमाफीबाबत जूनला निर्णय घ्यायचं ठरलंय. तो कसा होईल ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्हीसुद्धा शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर वेळच्या वेळी पैसे परत करण्याची सवय लावा ना. सारखंच फुकटात, सारखंच माफ.. कसं व्हायचं? असं चालत नाही. एकदा शरद पवारांनी कर्जमाफी दिली, एकदा देवेंद्र फडणवीसांनी दिली, एकदा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आम्ही दिली, आता पुन्हा आम्हाला निवडून यायचं होतं, म्हणून सांगितलं आम्ही माफ करू. लोक म्हणतात तुम्ही सांगितलं होतं माफ करू, आता करा माफ”, असं अजित पवार यावेळी म्हणाले
दरम्यान, अजित पवारांच्या विधानावर राजू शेट्टी यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शेतकरी काही भीक मागत नाही. मला अजित पवारांचं मान्य आहे. पण त्यासाठी आधी सरकार म्हणून अजित पवारांनी एक व्यवस्था करावी. महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकण्याची वेळ येणार नाही अशी धोरणं सरकारनं तयार करावीत. त्यांच्याकडे वारंवार कर्जमाफी मागायला आम्ही काय भिकारी नाही”, असं राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या वतीने अजित पवारांना म्हणाले आहेत.

