FIFA World Cup 2022: कतारच्या स्टेडियमच्या उभारणीत महाराष्ट्राच्या अभियंत्याचा सहभाग; कसं उभारलं स्टेडियम वाचा…

२० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ६४ सामने खेळले जाणार आहेत

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला कतारमध्ये दिमाखात सुरुवात झाली आहे. कतार स्टेडियमवर फिफा विश्वचषकाचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या स्टेडियमच्या उभारणीत महाराष्ट्रातील नागपूरच्या शाहीद अली या अभियंत्याचा सहभाग होता. स्टेडियमच्या बांधकामादरम्यान आलेल्या आव्हानांबाबत शाहीद अली यांनी ‘एएनआय’ला माहिती दिली आहे.

“कतार स्टेडियमवर फिफा फुटबॉल विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा पाहणं माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. या स्टेडियमच्या बांधकाम पथकामध्ये सहभाग असल्याबद्दल मला अभिमान आहे. वाढत्या तापमानाचा सामना करत काम करणं ही खूप आव्हानात्मक गोष्ट होती”, असं अली यांनी सांगितलं आहे. “२०१७ मध्ये स्टेडियमचं बांधकाम सुरू झाल्यानंतर मी कतारमध्ये दाखल झालो. चीन, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह ३५ देशांच्या लोकांचा हातभार या स्टेडियम उभारणीत लागला आहे. खालच्या स्तरावरील कामगारांपासून व्यवस्थापकीय पातळीवर या कामात भारतीयाचं योगदान आहे”, अशी माहिती अली यांनी दिली आहे.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

२० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा समारोप १८ डिसेंबरला होणार आहे. या दरम्यान आठ स्टेडियम्सवर ६४ सामने रंगणार आहेत. या स्पर्धेत जगभरातील ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सीची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा आहे. २०१८ मध्ये फ्रान्सने क्रोएशियाला हरवून विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

कतारसह इक्वाडोर, सेनेगल, नेदरलँड, इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मॅक्सिको, पोलंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया, स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान, बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोशिया, ब्राझिल, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरुन, पोर्तुगाल, घाना, उरुग्वे आणि दक्षिण कोरियाच्या संघांचा या स्पर्धेत समावेश आहे.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…