Foxconn: ‘फॉक्सकॉन’च्या भारतातील कारखान्यात होणार मेगाभरती; चीनमधील ‘ही’ घटना कारणीभूत

भारतातील ‘फॉक्सकॉन’च्या कारखान्यात येत्या दोन वर्षात ५३ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

भारतातील ‘फॉक्सकॉन’च्या आयफोन कारखान्यात लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. तायवान स्थित या कंपनीने येत्या दोन वर्षात भारतातील कर्मचाऱ्यांमध्ये चौपट वाढ करण्याची योजना आखली आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. चीनमधील कठोर करोना निर्बंधामुळे कंपनीच्या उत्पादनात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘फॉक्सकॉन’ने भारतात कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला दिली आहे.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

भारतातील ‘फॉक्सकॉन’च्या कारखान्यात येत्या दोन वर्षात ५३ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. या नोकरभरतीनंतर भारतातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ७० हजारांवर पोहोचणार आहे. तामिळनाडूच्या चेन्नईत फॉक्सकॉन कंपनीची फॅक्टरी आहे. या ठिकाणी सप्टेंबरपासून ‘आयफोन १४’ मॉडेलची निर्मिती करण्यात येत आहे.

करोना निर्बंधांना घाबरून चीनमधील झेंगझोऊ शहरातून हजारो लोकांनी पळ काढल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. अनेक कामगारांनी कंपनीच्या कपाऊंडवरुन उडी मारून कंपनीला रामराम ठोकला होता. हे कामगार ‘फॉक्सकॉन’चे असल्याचे एका वृत्तातून समोर आले आहे. चीनमध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या कंपनीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

‘फॉक्सकॉन’कडून ‘अ‍ॅपल’ला मोबाईल उपकरणांचा सर्वात जास्त पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे ‘फॉक्सकॉन’मधील उत्पादन रखडल्यानंतर ‘अ‍ॅपल’लाही नुकसान सहन करावं लागलं आहे. या कंपनीला ‘आयफोन १४’ च्या पुरवठ्यात समस्यांचा सामना करावा लागत आहे. करोना निर्बंधांमुळे ‘आयफोन १४ प्रो’ आणि ‘आयफोन १४ प्रो मॅक्स’च्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.