सण, उत्सवांमुळे सोने, चांदीचे दर पुन्हा तेजीत

सण, उत्सवांमुळे सोने, चांदीचे दर पुन्हा तेजीत
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 2 मिनिट )

सुवर्ण बाजारात लग्नसराई आटोपल्यापासून सोने, चांदीचे दर बऱ्यापैकी कमी झाले होते. मात्र, आगामी काळातील सण-उत्सवांची चाहुल लागताच दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. शनिवारी सोन्याच्या दरात ६१८ तर चांदीच्या दरात २०६० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.

सुवर्ण बाजारात ३० जून रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह ९८ हजार ८८० रुपये प्रति तोळा तर, चांदीचे दर जीएसटीसह एक लाख नऊ हजार १८० रुपये प्रति किलो होते. मधल्या काळात कमी-अधिक फरकाने दोन्ही धातुंच्या दरात चढ-उतार सुरू असताना, शनिवारी सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख एक हजार २४९ रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर एक लाख १६ हजार ३९० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. सोन्याच्या दरात १२ दिवसात २३६९  तसेच चांदीच्या दरात ७२१० रुपयांची वाढ नोंदविली गेली.

ज्यांच्या घरी लग्न ठरलेले असते, ते सोने आधीच घेऊन ठेवणे योग्य समजतात. शिवाय भविष्यात सोने दरात अधिक वाढ झाल्यास खर्च वाढू शकतो, त्यामुळे सध्याच्या भावात सोने घेऊन ठेवणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. ही संख्या यापुढेही टिकून राहण्याची सराफ व्यावसायिकांना आशा आहे.

See also  पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याविरोधात राज्यव्यापी जनजागृती अभियान