Gram Panchayat Election Result: “यादी जाहीर करा,” संजय राऊतांची मागणी; भाजपा म्हणाली “असाच अहंकाराचा शेवट…”

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे

Gram Panchayat Election Result: राज्यात झालेल्या सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्याने कोणत्या पक्षाला अधिक जागा मिळाल्या हे स्पष्ट होत नाही. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भाजपा नेते आशिष शेलार यांनी एक दिवस बहुतेक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ‘नॅनो’त मावतील एवढेच आमदार राहणार असा टोला लगावला आहे. तर संजय राऊत यांनी सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करा अशी मागणी केली आहे.

संजय राऊतांचं ट्वीट

“एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत असे म्हणणाऱ्या मंडळींनी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्रामपंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणार?”, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

“ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त जागा भाजपाने जिंकल्या. तर सगळ्यात ‘नॅनो’ जागा शिवसेना (उ.बा.ठा) गटाला मिळाल्या. अहंकाराचा शेवट असाच होणार! एक दिवस बहुतेक उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासोबत ‘नॅनो’त मावतील एवढेच आमदार राहणार,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज्यातील २४८२ ग्रामपंचायती जिंकून भाजपाने राज्यात पहिला क्रमांक कायम ठेवल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ८४२ ग्रामपंचायती जिंकल्याची माहिती भाजपच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली. भाजपाच्या दाव्यानुसार, भाजप आणि शिंदे गटाने मिळून ३,२०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. भाजपा आणि शिंदे गटाला यश मिळाल्यानेच विधान भवनाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी परस्परांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. या वेळी भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसने ९०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या असून, महाविकास आघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायती आणि सरपंचपदे जिंकल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच आम्हीच पहिल्या क्रमांकावर आहोत हा भाजपाचा दावा खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील २३६ पैकी २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या असून ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट असल्याचे स्पष्ट होते, असेही पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीनेही १३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना अशा महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. मनसेला मिळालेल्या यशाबद्दल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

महाविकास आघाडीचे यश, भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष

महाविकास आघाडी – ३२५०

राष्ट्रवादी – १५२३

कॅाग्रेस – १००१

शिवसेना (उद्धव ठाकरे) – ७२६

भाजप – शिंदे गट

भाजप – २३१८

शिंदे गट – ८२१

अपक्ष व इतर – १३६२