Gujarat Election: २९० कोटी कॅश, ५०० कोटींहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त; दारुबंदी असलेल्या राज्यात १५ कोटींची दारु ताब्यात

निवडणूक आयोगानेच यासंदर्भातील माहिती दिली असून एटीएसच्या सहकार्याने अनेक ठिकाणी झाली छापेमारी

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील १९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचला या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार थांबला होता. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच राज्यभरामध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान २९० कोटी रुपयांची रोकड, मादक पदार्थ, दारुचा साठा आणि भेटवस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१७ च्या विधानसबा निवडणुकीच्या तुलनेत यंदा जप्त करण्यात आलेली रक्कम ही १० टक्के अधिक आहे. वेगवेगळ्या यंत्रणांच्या मदतीने निवडणूक आयोगाने ही कारवाई केल्याचं म्हटलं आहे. दहशतवादी विरोधी पथक म्हणजेच गुजरात एटीएसच्या तुकडीच्या मदतीने वडोदरा (ग्रामीण) आणि वडोदरा (शहर) मतदारसंघामध्ये एक मोहिम चालवण्यात येत आहे. यामध्ये नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ प्रामुख्याने मेफेड्रोनची तस्करी केली जात असल्याची दोन प्रकरण उघडकीस आली आहेत. या छापेमारीमध्ये ४७८ कोटी किंमतीचं १४३ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं असून पाच जणांना अटक करण्यात आलीय.

हे वाचले का?  “झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप

निवडणूक आयोगाने ही मोहीम सुरुच राहणार असल्याचे संगाताना या तपासासंदर्भातील सविस्तर माहिती नंतर प्रसिद्ध केली जाईल असं म्हटलं आहे. २०१७ च्या निवडणुकीदरम्यान एकूण जप्त करण्यात आलेली रक्कम ही २७ कोटी २१ लाख इतकी होती. यंदा २९ नोव्हेंबरपर्यंत जप्त करण्यात आलेली रक्कम ही २९० कोटी २४ लाख इतकी आहे. ही मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत १०.६६ टक्के अधिक आहे.

गुजरात एटीएसच्या या मोहिमेदरम्यान प्रतिबंध असलेल्या औषधांबरोबरच ६१ कोटी ९६ लाखांचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. १४ कोटी ८८ लाख किंमत असलेली चार लाख लिटर दारुही जप्त केल्याचं आयोगाने म्हटलं आहे. दारुबंदी असलेल्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुचा साठा सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भाजपा उमेदवाराविरुद्ध दारुसंदर्भातील विधानामुळे एफआयआर
निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच भाजपाच्या एका उमेदवाराने मद्याची खुलेआम विक्री करता येऊ शकते, असे कथित वक्तव्य केले. त्यामुळे या उमेदवाराविरोधात ‘एफआरआय’ दाखल करण्यात आला आहे. गुजरातमध्ये मादक पदार्थ तयार करणे, बाळगणे, विक्री आणि वापरास बंदी आहे. २६ नोव्हेंबर रोजी एका सभेची चित्रफित प्रसारीत झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी बनारसकांठा जिल्ह्यातील दांता मतदारसंघातील भाजप उमेदवार लाटूभाई पारघी यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  मद्य खुलेआम विक्री करण्यास परवानगी देण्यात येईल, असे पारघी यांनी महिलांच्या एका गटासमोर कथित वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

आकडेवारी काय सांगते?
२०१७ मधील निवडणुकीत भाजपने या टप्प्यात ८९ पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ४० जागा जिंकल्या होत्या व एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. या टप्प्यात सर्व ८९ जागांवर भाजप-काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तर ‘आप’ने ८८ उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय ट्रायबल पार्टीसह (बीटीपी) इतर ३६ राजकीय पक्षांनी विविध जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ३३९ अपक्ष रिंगणात आहेत. गुजरातमधील एकूण चार कोटी ९१ लाख ३५ हजार ४०० पैकी दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ६७० मतदार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र आहेत. एकूण १४,३८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यापैकी तीन हजार ३११ केंद्र शहरी भागात व ११ हजार ०७१ केंद्र ग्रामीण भागात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

हे वाचले का?  रतन टाटांच्या कारकिर्दीत समूहाचा महसूल १८,००० कोटी रुपयांवरून ५.५ लाख कोटींवर