Gujarat Election 2022: निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरांना भाजपाचा दणका, आणखी १२ जणांवर निलंबनाची कारवाई

पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या १९ जणांवर आत्तापर्यंत भाजपाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

गुजरात विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना भाजपामध्ये बंडखोरीला उधाण आलेलं आहे. पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या तब्बल १२ जणांना भाजपाने एकाचवेळी निलंबित केले आहे. यामध्ये सहा वेळा आमदारकी भुषवलेल्या नेत्यासह दोन माजी आमदारांचा समावेश आहे. या सर्वांनी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या १९ जणांवर आत्तापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे निलंबन सहा वर्षांसाठी करण्यात आलं आहे. १ डिसेंबरला गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाने नुकतेच सात नेत्यांचे निलंबन केले आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये १८२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर भाजपाशी बंडखोरी केलेले उमेदवार निवडणूक लढवत आहेत. हिमाचल प्रदेश निवडणुकीसह गुजरात निवडणुकीचा निकालही ८ डिसेंबरला लागणार आहे.

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

भाजपाने या निवडणुकीत जवळपास तीन डझन विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. त्याचबरोबर पाच मंत्र्यांचाही पत्ता कट केला आहे. त्यामुळे नेत्यांनी बंडखोरीची वाट पत्करली आहे. हिमाचल प्रदेश निवडणुकीदरम्यान प्रत्येक तिसऱ्या जागेवर भाजपाला बंडखोरीचा सामना करावा लागला होता. तिच समस्या आता २७ वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असतानाही भाजपाला भेडसावू लागली आहे.

वाघोदियाचे विद्यमान आमदार आणि २००२ गुजरात दंगलीतील आरोपी मधू श्रीवास्तव, सावलीचे कुलदीपसिंह रावल, शेहराचे खाटूभाई, लुनावाडाचे एस. एस. खान्त, उमरेठचे रमेश झाला, धानेराचे मावजी देसाई आणि दिसाच्या लेबजी ठाकोर या महत्त्वाच्या नेत्यांचं निवडणुकीच्या तोंडावर भाजपामधून निलंबन करण्यात आले आहे.

हे वाचले का?  जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!