Gyanwapi Mosque Case: ज्ञानवापी मशीद खटल्याबाबत न्यायालय आज निर्णय देणार, वाराणसीत चोख सुरक्षा व्यवस्था

शहरातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी वाराणसीत ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत

उत्तर प्रदेशातातील वादग्रस्त ज्ञानवापी मशिदीच्या खटल्याबाबत आज वाराणसी जिल्हा आणि सत्र न्यायालय निकाल देणार आहे. या सुनावणीपूर्वी वाराणसीत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या याचिकेवरील निकाल जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी गेल्या महिन्यात राखून ठेवला होता.

हे वाचले का?  “झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप

दरम्यान, वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. निकालानंतर परिसरातील शांतता टिकवण्यासाठी स्थानिक धार्मिक नेत्यांशी संवाद साधण्यास पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. संवेदनशील भागात फ्लॅग मार्च काढण्याचे निर्देशही पोलिसांना आयुक्तांनी दिले आहेत. जिल्ह्याच्या सीमा, हॉटेल्ससह सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

‘अंजुमन इंन्तेझामिआ मशीद समिती’ने ज्ञानव्यापी मशिदीची जागा वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. या समितीने या खटल्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. या जागेवर असलेले मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू याचिकाकर्त्यांचे वकील मदन मोहन यादव यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या खटल्यावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी करण्यात येत आहे. दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने या मशिदीचे व्हिडीओ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल १९ ‘मे’ला न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणादरम्यान या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. हा दावा मुस्लीम पक्षाने फेटाळून लावला आहे.