Hardik Pandya Record in IND vs BAN 1st T20 : हार्दिक पंड्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने फलंदाजीत ३९ महत्त्वपूर्ण योगदान देत गोलंदाजीत एक विकेटही घेतली.
Hardik Pandya broke Virat Kohli record for most match winning sixes in T20I : भारतीय संघाने ग्वाल्हेर येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी १२८ धावांचे लक्ष्य दिले होते, जे टीम इंडियाने ११.५ षटकांत ३ गडी गमावून सहज गाठले. भारतासाठी वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि नितीश रेड्डी यांनी चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरली. या सामन्यादरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला.
हार्दिक पंड्याने केली खास कामगिरी –
टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने १६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. त्याने तस्किन अहमदच्या षटकात षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हार्दिकने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 वेळा षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. तर विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ वेळा षटकार मारून सामना जिंकून दिला होता. आता हार्दिकने कोहलीचा विक्रम मोडला आहे. षटकार मारून सर्वाधिक वेळा टी-२० सामने जिंकून देणारा तो भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत यांचाही समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी तीन वेळा षटकार मारून टी-२० सामना जिंकून दिला आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजयी षटकार ठोकणारे भारतीय खेळाडू:
हार्दिक पंड्या- ५ षटकार
विराट कोहली- ४ षटकार
एमएस धोनी- ३ षटकार
ऋषभ पंत- ३ षटकार
शिवम दुबे- १ षटकार
फलंदाजीपूर्वी हार्दिक पंड्याने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. त्याने ४ षटकात २६ धावा देत एक विकेट घेतली. याशिवाय क्षेत्ररक्षणातही त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याने तौहीद हृदय आणि रियाद हुसेन यांचे उत्कृष्ट झेल टिपले. तो भारतीय संघातील चपळ खेळाडूंपैकी एक आहे.
हार्दिक पांड्याची कारकीर्द –
हार्दिक पड्या भारतासाठी २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे. २०१६ मध्ये त्याने भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने एकूण १०३ टी-२० सामन्यांत ८७ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय १५६२ धावाही केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ८४ आणि कसोटीत १७ विकेट्स आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघात हार्दिकचा समावेश केला जाऊ शकतो आणि त्यासाठी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळू शकतो, अशा बातम्याही मीडिया रिपोर्ट्समध्ये आल्या आहेत. हार्दिकच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकच शतक आहे आणि त्याने ते फक्त कसोटीत झळकावलं आहे.