Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

Harini Amarasuriya Sri Lanka PM : हरिनी अमरसूर्या यांनी मंगळवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

Harini Amarasuriya sworn in as new Prime Minister of Sri Lanka : श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) संसद बरखास्त करण्याच्या विशेष राजपत्र अधिसूचनेवर स्वाक्षरी केली. तसेच त्यांनी चार सदस्यीय मंत्रिमंडळाची स्थापना केली. यासह हरिनी अमरसूर्या यांची श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी नेमणूक केली आहे. दिसनायके यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली. एनपीपी खासदार विजीता हेराथ व लक्ष्मण निपुणाराच्ची यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांच्याआधी सिरिमावो भंडारनायके व त्यांची मुलगी चंद्रिका भंडारनायके कुमारतुंगा यांनी श्रीलंकेचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. चंद्रिका कुमारतुंगा यांनी आधी पंतप्रधानपद व नंतर श्रीलंकेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

श्रीलंकेच्या या नवीन पंतप्रधानांचं भारताशी खास कनेक्शन आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. मंगळवारी श्रीलंकेच्या १६ व्या पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या हरिनी यांनी ९० च्या दशकात दिल्लीतील प्रतिष्ठित हिंदू महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. १९९१ ते १९९४ या काळात त्यांनी दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदवी मिळवली आहे. त्या या महाविद्यालयाच्या पहिल्या हेड ऑफ स्टेट देखील होत्या.

अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष

मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके (५६) हे श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. ते मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना (जेव्हीपी) या पक्षाच्या नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीचे नेते आहेत. त्यांनी समगी जन बलवेगया (एसजेबी) पक्षाचे नेते सजित प्रेमदासा यांचा पराभव केला. श्रीलंकेत ‘एकेडी’ नावाने परिचित असलेले दिसानायके श्रीलंकेचे मार्क्सवादी विचारसरणीचे पहिलेच अध्यक्ष आहेत.

हे वाचले का?  Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

भ्रष्टाचारविरोधी मोहीम आणि राजकीय संस्कृतीत बदल घडवण्याचे आश्वासन यामुळे तरुण मतदारांची दिसानायके यांना विशेष पसंती मिळाल्याचं निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. दिसानायके यांच्या एनपीपीला २०१९ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ तीन टक्के मतं मिळाली होती. ते मूळचे उत्तर मध्य प्रांतातील ग्रामीण थंबुटेगामाचे रहिवासी आहेत. त्यांनी कोलंबोमधील केलनिया विद्यापीठातून विज्ञानात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार