Heavy Rains In Marathwada : पावसाचे तांडव

मराठवाडय़ात १२ जणांचा मृत्यू; उत्तर महाराष्ट्रातही मोठे नुकसान 

मराठवाडय़ात १२ जणांचा मृत्यू; उत्तर महाराष्ट्रातही मोठे नुकसान 

औरंगाबाद / पुणे / नाशिक : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांना मंगळवारपासून पावसाने झोडपले. मराठवाडय़ात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने आलेल्या पुरात विविध जिल्ह्य़ांत पुरात १२ वाहून गेले. गेल्या आठवडय़ापासून अतिवृष्टीमुळे या भागांत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात नांदगाव,चाळीसगाव आणि धुळे जिल्ह्य़ातील अनेक भाग बुधवारी पाण्याखाली होते.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पुराचे पाणी घर, बाजारपेठेत शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. खान्देशातील पांझरा, तापी, गिरणा, वाघूर नदीला पूर आला आहे.

मराठवाडय़ात मंगळवारी रात्री पावसाने अक्षरश: तांडव घातले. नदी- नाल्यांना पूर आले. रात्रीतून पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहने पुरात वाहून गेली. औरंगाबाद शहरात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहरासह नांदेड, बीडसह मराठवाडय़ातील ४२१ मंडळापैकी १२० मंडळात अतिवृष्टी नोंदविण्यात आली. मराठवाडय़ातील पिकांचे मोठे नुकसान झाले.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

औरंगाबाद जिल्ह्य़ातील ४४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून लासूर- गंगापूर रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने बुधवारीही वाहतूक काही वेळ बंद होती. औरंगाबाद शहरातील तासभर मुसळधार पावसामुळे ८७ मिलिमीटर पाऊस झाला. शहरातील सर्व रस्त्यांची या काळात नाल्यासारखी स्थिती झाली होती.

मराठवाडय़ात जायकवाडी धरणाच्या खालच्या बाजूस गोदावरीचे पात्र दुधडी भरुन वाहत असून सिंदफणा, मांजरा, कयाधू या नद्यांची पातळी वाढत आहे. दरम्यान पोच्चमपाड धरणातील पाणीसाठा वाढत गेल्यास आणि नांदेडमध्ये पुन्हा पाऊस झाल्यास परिस्थिती हाताळता यावी अशी व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण विभागात सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला. संगमेश्वरमध्ये २९० मि.मी., गुहागर २४०, दापोली १५० मि.मी., तर बेलापूर (ठाणे), मुरूड, श्रीवर्धनमध्ये १२० मि.मी. पावसाची नोंद झाली.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

कोकणात इशारा कायम..

कोकण विभागात काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि राज्यावरील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात तीन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. गुरुवारपासून (९ सप्टेंबर) तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्येही जोरधारा..

नाशिक जिल्ह्यात २४ तासात ६२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. परिसरातील नद्यांच्या पुलावरून तसेच ग्रामीण भागातील काही पुलांवरून पाणी ओसंडून वाहत होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. धुळे जिल्ह्यात कोसळधार सुरु आहे.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

हानी..

औरंगाबादमध्ये २, जालन्यात १  परभणीमध्ये १, हिंगोलत १, नांदेडमध्ये ४, बीडमध्ये १, लातूरमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी बहुतांश जिल्ह्य़ांत वाहून गेलेल्या व्यक्तींचे मृतदेह सापडले. जीवित हानीबरोबरच २३ जनावरे वाहून गेली असून २३ घरांची पडझड  झाली.