IPL 2020 : अंतिम फेरीसाठीची झुंज!

‘क्वालिफायर-१’ सामन्यात मुंबई इंडियन्सची गाठ आज दिल्ली कॅपिटल्सशी

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून गुरुवारी रंगणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन बलाढय़ संघ १३व्या पर्वाच्या अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी उत्सुक आहेत.

चार वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने १४पैकी ९ सामने जिंकत १८ गुणांनिशी गुणतालिकेवर वर्चस्व गाजवले. मात्र अखेरच्या सामन्यात त्यांना सनरायजर्स हैदराबादकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. पहिलेवहिले जेतेपद पटकावण्यासाठी आतुर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सलगच्या चार पराभवांनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला सहा गडी राखून पराभूत करत आपली गाडी रुळावर आणली आहे. दिल्लीने १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.

कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन ही मुंबईसाठी जमेची बाजू आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला चार सामन्यांना मुकावे लागले होते. पण सनरायजर्सविरुद्ध त्याला अपेक्षित पुनरागमन करता आले नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर गतविजेता मुंबईचा संघ सक्षम आहे. मात्र सनरायजर्सविरुद्ध मुंबईची फलंदाजी ढेपाळली होती. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मुंबईला कामगिरी उंचवावी लागणार आहे.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

मुंबईची सलामीची जोडी तुफान बहरात असून इशान किशन आणि क्विंटन डीकॉक हे आतापर्यंत मुंबईच्या यशाचे भागीदार बनले आहेत. किशनने आतापर्यंत ४२८ तर डीकॉकने ४४३ धावा केल्या आहेत. त्यांना रोहितचीही तितकीच तोलामोलाची साथ लक्षात आहे. सूर्यकुमार यादवनेही महत्त्वाच्या क्षणी अप्रतिम खेळी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर आतापर्यंत ४१० धावा जमा आहेत. हाणामारीच्या षटकांमध्ये हार्दिक पंडय़ा (२४१ धावा), किरॉन पोलार्ड (२५९ धावा) यांनीही चमक दाखवली आहे.

मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची प्रमुख भिस्त जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावर असून त्यांनीही आपापली जबाबदारी आतापर्यंत चोखपणे निभावली आहे. बुमराने २३ तर बोल्टने २० बळी मिळवले आहेत. फिरकीपटू राहुल चहर त्यांना उत्तम साथ देत असून त्याने १५ बळी आपल्या नावावर केले आहेत.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सची मदार ही एक-दोन फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. सलामीवीर शिखर धवन तुफान बहरात असून त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतकांसह ५२५ धावा फटकावल्या आहेत. मात्र महत्त्वाच्या सामन्यात त्याची बॅट किती तळपते, यावर दिल्लीचे भवितव्य अवलंबून असेल. मुंबईकर पृथ्वी शॉ दिल्लीसाठी फारसा फलदायी ठरला नाही. पृथ्वी (२२८) आणि ऋषभ पंत (२८२) यांची कामगिरी हाच दिल्लीसाठी चिंतेचा विषय आहे. वेस्ट इंडिजच्या शिम्रॉन हेटमायर (१३८) आणि मार्कस स्टॉइनिस (२४९) हेसुद्धा भरीव योगदान देऊ शकले नाहीत.

मुंबईकर अजिंक्य रहाणेला गवसलेला सूर दिल्लीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. रहाणेने बेंगळूरुविरुद्ध ६० धावांची खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर कर्णधार श्रेयस अय्यर (४२१) आपल्यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे.

हे वाचले का?  Neeraj Chopra: ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा आज पुन्हा उतरणार मैदानात, डायमंड लीग स्पर्धा लाईव्ह कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार?

गोलंदाजीत कॅगिसो रबाडा (२५ बळी) आणि आनरिख नॉर्किया (१९ बळी) या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे प्रतिस्पर्धी फलंदाजावर वर्चस्व गाजवण्यात काहीसे यशस्वी ठरले आहेत. साखळी फेरीत मुंबईने दोन्ही वेळेला दिल्लीला हरवले आहे. त्यामुळे या सामन्यातही मुंबईचेच पारडे जड मानले जात आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.