Israel – Hamas Conflict Updates : जमिनीवरील कारवाई सुरू करण्याआधी हमासच्या तावडीत असलेल्या इस्रायली ओलिसांना सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही इस्रायल लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
Israel – Hamas War News in Marathi : गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनांमध्ये घमासान युद्ध सुरू आहे.एकमेकांवर क्षेपणास्रे डागून हवाई हल्ले केले जात आहेत. यामुळे आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांतील हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. हे युद्ध केव्हा थांबेल याची काहीही शाश्वती दिली जात नाहीय. दरम्यान इस्रायलने युद्धविरामाचा एक पर्याय सुचवला आहे. तो पर्याय हमासला मान्य असेल तरच हे युद्ध थांबू शकतं असं इस्रायल लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिक्स म्हणाले आहेत.
इस्रायलने हवाई हल्ल्यांना सुरुवात केली असून लवकरच जमिनीवरील कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी गाझाच्या सीमेवर इस्रायल लष्कर तैनात करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायलकडून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, दोन वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये इस्रायलच्या दोन प्रवक्त्यांनी गाझावर जमिनीवरील कारवाई कधी करणार याबाबत खुलासा केला आहे.
लेफ्टनंट कर्नल पीटर लर्नर यांनी बीबीसी न्युजआरला सांगितले की, जमिनीवरील कारवाई सुरू करण्याआधी हमासच्या तावडीत असलेल्या इस्रायली ओलिसांना सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जमिनीवरील हल्ला सर्वांत चांगल्या ऑपरेशनल वेळी केला जाईल, असंही ते पुढे म्हणाले.
…तर युद्धविराम शक्य
लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिक्स यांनी ऑस्ट्रेलिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, हमासने पूर्णपणे आत्मसमर्पण करून ओलिसांना सोडल्यास युद्धविराम केला जाईल. जेव्हा हमास नष्ट होऊन भविष्यात कधीही इस्रायली नागरिकांना नुकसान पोहोचवण्याची हिंमत करणार नाहीत, तेव्हाच हे युद्ध संपेल, असंही ते पुढे म्हणाले.
चार दहशतवाद्यांना कंठस्नान
दरम्यान, रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे इस्रायलने दक्षिण लेबनॉन आणि पॅलेस्टाईनच्या ताब्यात असलेल्या उत्तर गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात चार दहशतवादी मारले गेल्याचा दावा इस्रायल संरक्षण दलाकडून करण्यात आला आहे. तर, या हल्ल्यामुळे ३० पॅलेस्टाईन नागरिकांचा जीव गेल्याची माहिती पॅलेस्टाईन आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसंच, अतिरिक्त वैद्यकीय पुरवठा गाझा पट्टीमध्ये दाखल झाला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी दिली.