Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Jammu-Kashmir : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली होती. त्यानंतर रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

राजौरी जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कराने दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यावेळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. रविवारी मध्यरात्री झालेल्या घुसखोरीच्या विरोधात भारतीय जवानांनी ही मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हे वाचले का?  छुप्या दहशतवादाचे हत्यार! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश

घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांकडून एके-४७ रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर एलओसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर आता या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरात दहशतवादी चकमकीची ही दुसरी घटना आहे. २ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील सुंजवानच्या परिसरात दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला होता. यामध्ये एक जवान शहीद झाला होता. तेव्हाही भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.

हे वाचले का?  भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचा ध्यास; दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीव सुरक्षा यंत्रणा अलर्ट

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत.