Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते.

नाशिक : एक जूनपासून आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १७ हजार १४९ दशलक्ष घनफूट म्हणजे सतरा टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सोडले गेले आहे. पावसाने उघडीप घेतल्यामुळे सध्या विविध धरणांमधील विसर्ग कमी करण्यात आला आहे. मागील आठवड्यात सलग तीन-चार दिवस मुसळधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. धरण परिचालन सूचीनुसार ऑगस्टच्या पूर्वार्धात मोठ्या धरणांमध्ये साधारणत: ८५ ते ८८ टक्क्यांदरम्यान जलसाठा करता येतो. त्यानुसार अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता.

गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते. त्या काळात नांदूरमध्यमेश्वरचा विसर्ग ५४ हजार क्युसेकवर पोहोचला होता. परंतु, मंगळवारनंतर पावसाने उघडीप घेतली. पुढील काळात अधूनमधून रिपरिप होत असली तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. याचा परिणाम जायकवाडीकडे जाणाऱ्या पाण्यावर झाला आहे. पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीनुसार या हंगामात मागील सोमवारपर्यंत साडेदहा टीएमसी पाणी नांदूरमध्यमेश्वरमधून सोडले गेले होते. सोमवारची आकडेवारी पाहिल्यास यात नव्याने सात टीएमसीची भर पडली. आतापर्यंत एकूण १७.१४ टीएमसी पाणी नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीसाठी सोडण्यात आल्याची पाटबंधारे विभागाची आकडेवारी आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

पाच धरणे तुडूंब

जिल्ह्यातील धरणसाठा ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील भावली, वालदेवी, भोजापूर, केळझर व हरणबारी ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८५.३३ टक्के जलसाठा झाला आहे. या धरण समुहातील काश्यपीत ५८ टक्के, गौतमी गोदावरीत ९०, आळंदीत ९१ टक्के जलसाठा आहे. पालखेड धरणात ६८, करंजवण ६३, वाघाड ८५, ओझरखेड ४६, पुणेगाव ७७, तिसगाव २३, दारणा ८८, कडवा ८२, नांदूरमध्यमेश्वर बंधारा ९७ टक्के जलसाठा झाला आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर धरणात ७५, गिरणा ४२, पुनद ५१ टक्के जलसाठा आहे. या भागातील नागासाक्या आणि माणिकपुंज ही दोन धरणे अद्याप कोरडी आहेत.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

विसर्ग कमी

पावसाने उघडीप घेतल्याने धरणांमधील विसर्ग बराच कमी करण्यात आला आहे. मागील आठवड्यात ५४ हजार क्युसेकवर असणारा नांदूरमध्यमेश्वरचा विसर्ग सध्या पाच हजार क्युसेकवर आला आहे. दारणा धरणातून २००१, भावली २०८, कडवा ४१३, भाम ११२०, वालदेवी १०७, गंगापूर ९५१, भोजापूर धरणातून ३९९ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. मागील आठवड्याच्या तुलनेत सर्वच धरणांमधील विसर्गात लक्षणीय घट झाली आहे.