“माझी पत्नी उषा ही हिंदू असून, तिचा धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा कोणताही विचार नाही,” असा खुलासा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केला आहे. व्हान्स यांनी अलिकडेच स्वतःच्या आंतरधर्मीय विवाहावर टिप्पणी करताना, उषादेखील माझ्यासारखीच चर्चची उपासना करेल, अशी आशा व्यक्त केली होती. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
‘युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी’ येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात एका दक्षिण आशियाई महिलेने व्हान्स यांच्यावर धार्मिक श्रद्धांविषयी प्रश्नांचा भडिमार केला होता. या घटनेनंतर व्हान्स यांनी उषा व्हान्स यांचा धर्मांतर करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
“माझी पत्नी उषा ही हिंदू असून, तिचा धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा कोणताही विचार नाही,” असा खुलासा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केला आहे. व्हान्स यांनी अलिकडेच स्वतःच्या आंतरधर्मीय विवाहावर टिप्पणी करताना, उषादेखील माझ्यासारखीच चर्चची उपासना करेल, अशी आशा व्यक्त केली होती. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.
‘युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी’मध्ये बुधवारी झालेल्या ‘टर्निंग पॉइंट’ कार्यक्रमात आणि समाजमाध्यमावर व्हान्स यांनी आपल्या पत्नीच्या धार्मिक श्रद्धांविषयी टिप्पणी केली होती. विद्यापीठातील या कार्यक्रमात एका महिलेने व्हान्स यांचा धर्म, त्यांनी उषा यांच्याशी केलेला आंतरधर्मीय विवाह आणि स्थलांतरितांबद्दल ट्रम्प प्रशासनाचे धोरण यावरून त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. त्या महिलेला उत्तर देताना, व्हान्स यांनी सांगितले की, “बव्हंशी रविवारी उषादेखील माझ्याबरोबर चर्चला येते. माझ्यावर जसा चर्चचा प्रभाव पडतो, तसाच तो माझ्या पत्नीवरही पडावा असे मला वाटते. हे मी जसे तिला सांगितले आहे, तसेच आता १० हजार मित्रांसमोरही सांगत आहे.”
याच मुद्द्यावर समाजमाध्यमावर व्हान्स यांनी लिहिले होते की, “माझ्या पत्नीचा जन्म आणि पालनपोषण हिंदू कुटुंबात झाले. मला आशा आहे की, माझ्याप्रमाणे एक दिवस तीही चर्चमध्ये प्रार्थना करू लागेल.” या पोस्टवरही बरीच टीका झाली होती. ख्रिश्चन आणि श्वेतवर्णीय राष्ट्रवादींना खुश करण्यासाठी व्हान्स यांनी ही पोस्ट लिहिली आहे, अशी टीका एका वाचकाने केली होती. ती व्हान्स यांनी फेटाळून लावली होती.
उषानेच अनेक वर्षांपूर्वी मला पुन्हा एकदा ख्रिश्चन धर्माची ओळख करून दिली, असे त्यांनी ‘एक्स’वरील उत्तरामध्ये लिहिले. या सर्व वादाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर जे. डी. व्हान्स यांनी उषा व्हान्स यांचा धर्मांतर करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
माझ्या पत्नीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही तरी, ईश्वर सांगतो की प्रत्येकाची स्वतंत्र इच्छा असते. त्यामुळे तिची इच्छा ही माझ्यासाठी समस्या नसेल. तुमही ज्यांच्यावर प्रेम करता, त्यांच्याशी तुम्ही या विषयावर बोलू शकता.- जे. डी. व्हान्स,उपाध्यक्ष, अमेरिका



