क्षीरसागर सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्बंध

क्षीरसागर सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्बंध
( वाचण्यासाठी लागणारा वेळ अदमासे 2 मिनिट )

निफाड तालुका कार्यक्षेत्र असलेल्या लोकनेते आर. डी. (आप्पा) क्षीरसागर सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ च्या कलम ५६ सह कलम ३५ अ अंतर्गत निर्बंध आणण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे बँकेचे ठेवीदार आणि सभासदांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सभापती आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर हे या बँकेचे चेअरमन आहेत.

लोकनेते आर. डी. (आप्पा) क्षीरसागर सहकारी बँकेतील घडामोडींमुळे उद्भवलेल्या महत्त्वपूर्ण पर्यवेक्षकीय चिंतांमुळे आणि बँकेच्या ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे निर्देश देणे आवश्यक झाले असल्याचे मुख्य महाव्यवस्थापक ब्रज राज यांनी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार बँकेला कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही, निधीची उभारणी आणि नवीन ठेवी स्वीकारण्यासह कोणतीही जबाबदारी स्वीकारता येणार नाही.

आपली दायित्वे आणि जबाबदाऱ्यांच्या पूर्ततेसाठी किंवा कोणतेही पेमेंट वितरित करता येणार नाही किंवा वितरित करण्यास सहमती दर्शवता येणार नाही, कोणताही समझोता किंवा व्यवस्था करता येणार नाही. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारेपर्यंत हे निर्बंध राहतील, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

See also  मुंबई नाशिक महामार्गावर चार महिने वाहतुक बदल